विभागातील १६६ जलसाठे १०० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:32+5:302021-09-17T04:12:32+5:30
नागपूर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या चांगल्या पावसाने विदर्भातील लघु व मध्यम जलसाठ्यांना संजीवनी मिळाली आहे. नागपूर विभागातील लहानमाेठे १६६ ...
नागपूर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या चांगल्या पावसाने विदर्भातील लघु व मध्यम जलसाठ्यांना संजीवनी मिळाली आहे. नागपूर विभागातील लहानमाेठे १६६ जलसाठे १०० टक्के भरल्याची नाेंद जलसंपदा विभागाने केली आहे. त्यातील १४७ जलसाठे १५ सप्टेंबरपूर्वी तर १९ जलसाठे १५ सप्टेंबरपर्यंत भरले. माेठ्या प्रकल्पांना मात्र पाणीसाठा पूर्ण हाेण्याची प्रतीक्षा आहे.
जलसंपदा विभागाने माेठे प्रकल्प, लघु व मध्यम जलसाठे व मामा तलाव मिळून ३७२ जलाशयांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार १५ सप्टेंबरपूर्वी २ माेठे प्रकल्प, २६ मध्यम व ७४ लघु प्रकल्पांसह ४५ मामा तलाव १५ सप्टेंबरपूर्वीच १०० टक्के भरले हाेते. १५ सप्टेंबरला १४ लघु प्रकल्प व ५ मामा तलाव १०० टक्के भरले. या १९ जलसाठ्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील वाकेश्वर, माहुरपाला, चाेरबाहुली, खिडकी, कान्हादेवी ही ५ लघु प्रकल्प तसेच गाेंदिया २, भंडारा ३, वर्धा ३, चंद्रपूर ३ व गडचिराेलीतील दाेन मामा तलाव व एका लघु प्रकल्पाचा समावेश आहे. असे एकूण २ माेठे प्रकल्प, २६ मध्यम, ८८ लघु प्रकल्प व ५० मामा तलाव १०० टक्के भरले आहेत.
माेठे तलाव अपूर्ण
नागपूर विभागात १८ माेठे प्रकल्प आहेत. यातील नागपूर जिल्ह्यातील ताेतलाडाेह, खिंडसी, कामठी खैरी, नांद व वडगाव यांचा समावेश आहे. हे पाचही जलाशय आतापर्यंत ८० टक्के भरले आहेत. याशिवाय भंडारा जिल्ह्यातील गाेसेखुर्द व बावनथडी व इतर माेठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. १८ पैकी केवळ दाेन माेठे प्रकल्प भरले आहेत. १६ प्रकल्पांना अद्याप पूर्णत्वाची प्रतीक्षाच आहे. सप्टेंबर शेवटपर्यंत चांगला पाऊस झाला तर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
२०६ जलसाठे भरणे बाकी
१६६ जलसाठे १०० टक्के भरले असले तरी २०६ जलसाठे अद्याप पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. १४ मध्यम प्रकल्प, ९१ लघु प्रकल्प आणि ८५ मामा तलाव पूर्ण भरलेले नाहीत. १६ माेठ्या प्रकल्पांचाही अपूर्ण भरलेल्यांमध्ये समावेश आहे.