१६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:22+5:302021-04-08T04:08:22+5:30

नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या २,५४,२२१ वर पोहोचली. नागपूर शहरात ३,२८३ तर नागपूर ग्रामीणमध्ये २,०४८ रुग्णांची भर ...

166 villages blocked the Corona at the gates | १६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

१६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

googlenewsNext

नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या २,५४,२२१ वर पोहोचली. नागपूर शहरात ३,२८३ तर नागपूर ग्रामीणमध्ये २,०४८ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. जिल्ह्यातील १,९०४ गावापैकी सध्या १६६ गावेच कोरोनामुक्त आहेत. गाव कोरोनामुक्त ठेवण्यात येथील ग्रामपंचायतींनी आखलेल्या उपाययोजना व त्यास गावकऱ्यांनी केलेले सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.

नागपूर जिल्ह्यात (ग्रामीण) ७६८ ग्रामपंचायती आहेत. याअंतर्गत १,९०४ गावांचा कारभार चालतो. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतरच उपराजधानीत कोरोनाने शिरकाव केला. याच काळात गावाच्या वेशी सील करण्यात आल्या. गावाच्या वेशीवर बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोखण्यात आले. प्रसंगी वादही झाले. गावकरी आणि सरपंच त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यावेळी जिल्ह्यातील अनेक गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. मात्र डिसेंबरनंतर अनलॉकच्या प्रक्रियेनंतर संक्रमण वाढीला वेग लागला आला. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात ५६,४१८ रुग्णांची नोंद झाली आहे तर, १,१५८ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ४०,८१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ग्रामीण भागात १३,८८८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक आहे. यात कामठी, कन्हान, कळमेश्वर, वानाडोंगरी, हिंगणा, काटोल, सावनेर नगर परिषद क्षेत्रात स्थिती निश्चितच चिंताजनक आहे. गतवर्षी गावातील व्यक्ती गावात आणि बाहेरील व्यक्ती बाहेरच हा मंत्र ग्रामपंचायतींनी अवलंबल्याने एप्रिल आणि मे महिनाअखेर जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनामुक्त राहिले. मात्र अनलॉकनंतर गावातील नोकरदार रोजगारासाठी बाहेर पडल्यानंतर गावात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला. हा शिरकाव प्रामुख्याने परजिल्ह्यात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले युवक आणि गावातून शहरातील कंपन्यात कामावर जाणाऱ्या कामगारांच्या माध्यमातून झाला. जिल्ह्यात पहिला रुग्ण १ एप्रिलला कामठी येथे आढळून आला.

सद्यस्थितीत ॲक्टीव्ह रुग्ण

नागपूर जिल्हा : ४२,९३३

नागपूर शहर : २९,०४५

नागपूर ग्रामीण : १३,८८८

---

एकूण मृत्यू : ४,६१६

नागपूर शहर : ३,४५८

नागपूर ग्रामीण : १,१५८

नेमके काय केले?

१) गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावाच्या सीमा सील करण्यात आल्या. बाहेरच्यांना गावात बंदी.

२) गावात सोडियम हायफोक्लोराईडची वारंवार फवारणी करण्यात आली. नाल्या व रस्त्याची स्वच्छता करण्यात आली.

३) गावात कोरोना दक्षता समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यमातून गावावर लक्ष ठेवण्यात आले. ते कार्य अद्यापही सुरू आहे.

५) गावकऱ्यांना वारंवार हात स्वच्छ करणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याची सवय लावली.

६) लॉकडाऊन काळात गावात बाहेरून येणाऱ्याची वेशीवरच नोंद घेण्यात आली. स्थानिकानाच आत प्रवेश दिला.

-

२४ मार्च २०२० पासून शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत गावात कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. गावातील युवक व महिला यांची वाॅर्डनुसार कोविड योद्धा म्हणून नियुक्ती केली. गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नेहमी चौकशी करण्यात आली.

- सुधीर गोतमारे, सरपंच, खुर्सापार, ता. काटोल

सर्वप्रथम संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे महत्त्व पटवून देण्यात आले. ग्रामपंचायतीद्वारे बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांवर निर्बंध लावण्यात आले. गावाला कोरोना संक्रमणापासून वाचविण्याबाबत प्रत्येकाला जाणीव करून दिली.

सविता गोतमारे

सरपंच, पारडी (गोतमारे), ता. काटोल

गतवर्षी कोरोनाने जिल्ह्यात प्रवेश केला. यापासून गाव वाचविण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आल्या. गावात होणारे सार्वजनिक कार्यक्रम किती धोकादायक आहेत, हे सांगून त्यावर अटकाव करण्यात आला. सध्या गावात एकही संक्रमित रुग्ण नाही. लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.

उषा वाहणे

सरपंच, गट ग्रामपंचायत जुनापाणी (जामगड), ता. काटोल

काही महिन्यापूर्वी गावात कोरोनाबाधितांची नोंद झाली. यानंतर गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. गावात कोविड तपासणी शिबिर लावून सर्वच नागरिकांची तपासणी करण्यात आली. सध्या गावातील लसीकरण प्रक्रियेवर विशेष भर देण्यात येत आहे.

- प्रांजल वाघ, सरपंच, कढोली, ता. कामठी

गावात सहा महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्वच्छता अभियान, घरोघरी सॅनिटायझेशन करण्यात आले. हे कार्य निरंतर सुरू आहे. गावातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुक्त गावासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

अरुण आकरे, सरपंच, नेरी-उनगाव ग्रा.पं., ता. कामठी

Web Title: 166 villages blocked the Corona at the gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.