जि.प.तील पेन्शन घोटाळा; रक्कम वळती झालेले खातेधारक गुन्हे शाखेच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 06:17 PM2022-11-29T18:17:23+5:302022-11-29T18:19:44+5:30
बोगस १७ खातेदारांची होणार चौकशी
नागपूर : पारशिवनी पंचायत समितीमधील कोट्यवधीच्या पेंशन घोटाळ्यात रक्कम वळती करण्यात आलेल्या १७ खातेधारकांची पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेतील १.८६ कोटीच्या पेंशन घोटाळ्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. मुख्य सूत्रधार सरिता नेवारे हिने ही रक्कम १७ बोगस खात्यात वळती केल्याचे निदर्शनास आले आहे. या खातेधारकांना गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यांच्या खात्यात रक्कम कशी वळती करण्यात आली. कुणाच्या सांगण्यावरून या खात्याचा वापर करण्यात आला. ही रक्कम कुणी काढली. खाते काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुणी तयार केली, याची माहिती घेतली जाणार आहे.
या १७ खात्यांपैकी दोन खाती सरिता नेवारे हिचे पती व मुलीच्या नावाची आहे. अन्य खाती नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींची आहेत. या सर्वांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. १७ खातेधारकांची कागदपत्रे सरिता नेवारे यांनी तयार केली की, दलालांनी याचाही शोध घेतला जाणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीचा अहवाल एक-दोन दिवसांत सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. या अहवालाची मदत पोलिस तपासात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खातेधारकांच्या अडचणी वाढल्या
जि.प.तील सेवानिवृत्त मृत कर्मचाऱ्यांच्या नावावर पेंशन उचलण्यात आली. मृत कर्मचाऱ्यांच्या नावावरील पेंशन उचलण्यासाठी बोगस खाती काढण्यात आली. यासाठी लागणारी कागदपत्रे कुठल्या रॅकेटने तर तयार करून दिली नाही ना, याचाही शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणात खातेधारक चांगलेच अडचणीत येणार आहेत.