चलनातून बाद झालेल्या १७ लाखांच्या नोटा जप्त
By admin | Published: February 24, 2017 03:02 AM2017-02-24T03:02:49+5:302017-02-24T03:02:49+5:30
तहसील पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर गांधीबाग परिसरात एका कारमधून १७ लाखांच्या जुन्या (चलनातून बाद झालेल्या) नोटा जप्त केल्या.
दोघे ताब्यात : तहसील पोलिसांची कारवाई
नागपूर : तहसील पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर गांधीबाग परिसरात एका कारमधून १७ लाखांच्या जुन्या (चलनातून बाद झालेल्या) नोटा जप्त केल्या. टिफीन बॅगमध्ये लपवून या नोटा नेल्या जात होत्या. कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलीस गुरुवारी पहाटेपर्यंत चौकशी करीत होते.
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला तहसील ठाण्याचे पोलीस पथक गस्तीवर होते. गांधीबाग लाल इमली चौकापासून काही अंतरावर असलेल्या मध्यरात्री पोलिसांना एमएच ३१/ईयू ७६८६ क्रमांकाची आय-२० कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. आतमध्ये आनंद राठी (वय ३६, रा. धरमपेठ) आणि अमित येसखेडे (वय ३५, रा. बजाजनगर) हे दोन व्यक्ती आढळले.
पोलिसांना पाहून ते घाबरल्याने पोलिसांचा संशय वाढला. मागच्या सीटवर दोन टिफीन बॅग आढळल्या. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यात चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या एकूण १७ लाख रुपयांच्या नोटा आढळल्या. पोलिसांनी नोटा, राठी तसेच येसखेडे आणि कार जप्त करून बुधवारी पहाटे १ च्या सुमारास त्यांना पोलीस ठाण्यात आणले. ही रोकड कुणाची आहे, त्याचा पहाटेपर्यंत पोलीस शोध घेत होते. याबाबतची सविस्तर माहिती ते दोघे टाळाटाळ करीत होते.
दरम्यान, माहिती कळताच परिमंडळ ३ चे उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त अरुण जगताप, पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर पोलीस ठाण्यात पोहोचले. गुरुवारी सकाळी वरिष्ठांशी सल्लामसलत केल्यानंतर पोलिसांनी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. चलनातून बाद झाल्यानंतर एवढी मोठी रक्कम कुणी आणि कोणत्या उद्देशाने जवळ ठेवली होती, त्याची चौकशी केली जात आहे. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यात गर्दी
चलनातून बाद झालेल्या नोटा पोलिसांनी राठी आणि येसखेडेकडून पकडल्याचे कळताच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली. अनेकांनी पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने दडपणही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी एका एजंटच्या घरी नेल्या जाणार होत्या.