एकाच दिवशी कोरोनाचे १७ नवे रुग्ण; एच३एन२ ची लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 08:30 AM2023-03-29T08:30:00+5:302023-03-29T08:30:02+5:30
Nagpur News सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. मंगळवारी कोरोनाचे सर्वाधिक १७ नवे रुग्ण आढळून आले. यावर्षातील ही सर्वाधिक नोंद आहे.
नागपूर : सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. मंगळवारी कोरोनाचे सर्वाधिक १७ नवे रुग्ण आढळून आले. यावर्षातील ही सर्वाधिक नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, २८ दिवसांत रुग्णांची संख्या शंभरी जवळ पोहचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य विभागाची चिंताही वाढली आहे.
सर्दी, खोकला, ताप या लक्षणांच्या ‘ एच३एन२ ’ विषाणूचे रुग्ण दिसून येत असताना ही लक्षणे असलेल्या कोरोनाचे ही रुग्ण वाढत असल्याने अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मास्क वापरणे, गर्दीचे ठिकाण टाळणे व वारंवार हात धुण्यावर पुन्हा एकदा जोर दिला जात आहे. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी २० रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज पहिल्यांदा रुग्णांची संख्या १७ वर पोहचली. या महिन्यात आतापर्यंत ९६ रुग्णांची नोंद झाली. चार वर्षातील रुग्णांची एकूण संख्या ५,८७,५१८ झाली असून मृतांची संख्या १०,३५८ वर स्थिर आहे.
-ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३
मंगळवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरातील १० तर ग्रामीण भागातील ६ रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३ झाली आहे. यात शहरातील ३९ , ग्रामीण भागातील ११ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ३९ रुग्ण असून १४ रुग्ण विविध शासकीय व खासगी रुग्णालयात भरती आहेत. यात मेडिकलमध्ये ७, रेल्वे हॉस्पिटलमध्ये २, खासगी हॉस्पिटलमध्ये ४ तर प्रादेशिक मनोरुग्णालयात १ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-चाचण्यांच्या तुलनेत १८ टक्के रुग्ण बाधित
मंगळवारी शहरात ३१ तर ग्रामीण भागात ६५ असे एकूण कोरोनाच्या ९६ तपासण्या झाल्या. त्यात १८ टक्के रुग्ण बाधित आढळून आले. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.
-मनोरुग्णालयातही कोरोनाचा शिरकाव
प्रादेशिक मनोरुग्णालयात एका पुरुष रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज बागडे यांनी सांगितले, भरती होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कोरोना तपासणी केली जाते. यात हा रुग्ण पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला कोणतेही लक्षणे नाहीत. जानेवारी ते आतापर्यंत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. इतर रुग्णांना याची लागण होऊ नये म्हणून वॉर्ड क्र. ८ मध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
-तीन महिन्यातील कोराेनाची स्थिती
जानेवारी : १० रुग्ण
फेब्रुवारी : ०७ रुग्ण
२८ मार्चपर्यंत : ९६ रुग्ण