नियम मोडणाऱ्या १७ बाधितांची केअर सेंटरमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:19+5:302021-03-13T04:11:19+5:30
नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई : गृह विलगीकरणातील बाधितांच्या घरांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता ...
नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई : गृह विलगीकरणातील बाधितांच्या घरांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार मनपाच्या भरारी पथकांनी गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांच्या घरी तपासणी सुरू केली आहे. गुरुवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील १४ व आशीनगर झोनमधील तीन अशा १७ बाधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांची कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
लक्ष्मीनगर झोनमधील १३ रुग्णांना व्हीएनआयटी, तर एकाला पाचपावली कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. आशीनगर झोनमधील तीन कोरोनाबाधितांना पांचपावली विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. इतर झोनमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांच्या घरी जाऊन भरारी पथक तपासणी करत आहे. जर त्यांना नियमांचे पालन होताना दिसले नाही, तर त्यांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येईल. वैद्यकीय कारणाशिवाय गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय ५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
.......