उपराजधानीत सिग्नल तोडणारे १७ हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:02 AM2018-12-18T10:02:50+5:302018-12-18T10:04:58+5:30
नागपुरात जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १७ हजार ३६५ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडल्याची नोंद आहे. ही प्रवृत्ती वाढत असल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चौकातील वाहतूक सिग्नलवर पोलीस असतील तरच नियम पाळले जात असल्याचे चित्र आहे. अनेकदा एका मार्गावर वाहतूक पोलीस उभा असल्यास वाहनचालक सिग्नल तोडत दुसऱ्या मार्गाचा वापर करतात. जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १७ हजार ३६५ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडल्याची नोंद आहे. ही प्रवृत्ती वाढत असल्याचे वास्तव आहे.
वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्यामुळे गेल्या अकरा महिन्यातील ‘सिग्नल जंपिंग’मध्ये १७ हजार ३६५ प्रकरणे समोर आली. यात साधारण ६० टक्के युवक असल्याची माहिती आहे. यातून शासनाच्या तिजोरीत लाखाच्यावर महसूल जमा झाला आहे.
सीसीटीव्हीचा प्रभाव नाही
शहरातील बहुसंख्य चौकात सीसीटीव्ही आहे. परंतु दुचाकी चालकांना त्यांची पर्वा नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, दर सेंकदाला वाहतूक सिग्नल तोडले जात असताना सर्वांनाच नोटीस मिळते असे नाही, यामुळे सीसीटीव्ही असूनची त्याचा प्रभाव पडत नसल्याचे चित्र आहे.