युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 11:02 AM2022-04-04T11:02:00+5:302022-04-04T11:18:00+5:30
प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले.
नरेश डोंगरे
नागपूर : गर्भधारणा झाल्यानंतर एका युवतीने युट्यूबवर सर्च करून वेगवेगळे उपाय केले अन् स्वत:च स्वत:चे अबॉर्शन करून घेतले. हा अघोरी प्रकार पाहून पालकांनी तिला तत्काळ नागपुरात उपचारासाठी आणले. तिची प्रकृती आता ठीक आहे. मात्र, या प्रकरणाची तक्रार झाल्याने पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अविवेक आणि अघोरीपणाचा नमुना ठरलेले हे प्रकरण शनिवारी चर्चेला आले.
प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. वर्षभरापूर्वी त्या तरुणाला नागपुरातील एका इस्पितळात रोजगार लागला. त्यामुळे तो इकडे आला आणि एमआयडीसी परिसरात रूम करून राहू लागला. परिणामी, या दोघांची ताटातूट झाली. त्यामुळे विरहाने कासावीस झालेले हे दोघे संधी मिळेल तेव्हा एकमेकांना भेटू लागले. कधी हा नरखेडला जात होता, तर कधी ती नागपुरात येत होती.
सहा महिन्यांपूर्वी ती अशीच एकदा नागपुरात येऊन त्याच्या रूमवर मुक्कामी थांबली. येथे चार दिवसांत त्यांचे अनेकदा शरीरसंबंध आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीपासून तिला मळमळ, उलटीचा त्रास वाढला. गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर ती हादरली. तिने प्रियकराला हा प्रकार सांगितला. तो इस्पितळात काम करत असल्याने त्याने तिला काही औषधे दिली. त्यातील काही तिने खाल्ली. मात्र, उपयोग झाला नसल्याने बाकी औषधे फेकून दिली. त्यानंतर गर्भपात कसा करायचा, त्याची माहिती मिळवण्यासाठी तिने यू ट्यूबवर क्लास घेणे सुरू केले. तासन्तासाच्या सर्चिंगनंतर तिला काही गावठी औषधांची माहिती मिळाली. त्याचा तिने काढा तयार करून तो घेतला. त्यामुळे तिचा चार दिवसांपूर्वी घरीच गर्भपात झाला.
पाच महिन्यांचे अर्भक अन्
मुलगी सुस्त पडल्याचे पाहून आईने इकडे-तिकडे पाहणी केली असता पाच महिन्यांचे अर्भक खाली पडलेले दिसले. ते तसेच मुलीला उचलून पालकांनी मेडिकल इस्पितळात आणले. अर्भक मृतावस्थेत होते. डॉक्टरांनी मुलीवर उपचार केले. तिची प्रकृती आता ठीक आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यांनी पोक्सो कायद्यानुसार मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रकरण एमआयडीसी पोलिसांकडे
मुलीसोबत शरीरसंबंध नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रस्थापित झाले अर्थात गुन्ह्याची सुरुवात इकडून झाल्यामुळे हे प्रकरण ग्रामीण पोलिसांनी एमआयडीसीकडे शनिवारी वर्ग केले. एमआयडीसी पोलीस आता आरोपी प्रियकराचा शोध घेत आहेत.