ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन; एसटीकडे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:45 AM2022-12-29T05:45:03+5:302022-12-29T05:45:35+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य शासनातर्फे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. या संदर्भात राजेश राठोड व इतर सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
नवीन बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. सन २०१६-१७ पासून २०२१-२२ या कालावधीत एसटी महामंडळाने तीन हजार २३४ बसेस घेतल्या आहेत. यात ६१७ बसेस या भाडेतत्त्वावर तर दाेन हजार ६१७ बसेस या मालकी तत्वावर आहेत. राज्याकरिता मोठ्या प्रमाणावर बसेसची आवश्यकता असून नवीन ७०० बसेसची खरेदी अंतिम टप्प्यात असून नव्याने दाेन हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. सातशे बसेसमध्ये ४५० डिझेल बसेस, ५० इलेक्ट्रिक बसेस तर २०० निमआरामदायी बसेसचा समावेश आहे. या ७०० बसेसपैकी १९० बस चेसिस ताब्यात मिळाले असून यावर बॉडीबिल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
शाळा- विद्यालयांच्या वेळेनुसार वेळापत्रक
ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागात शाळा, महाविद्यालयांत वेळेत जाण्यासाठी एसटी बसेसच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल केला जाईल. विद्यार्थी तसेच पालकांना बसेसच्या वेळेबाबत काही तक्रारी, सूचना असल्यास त्या डेपोमार्फत दूर केल्या जातील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"