नागपुरात १७० धोकादायक इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 09:57 PM2021-06-05T21:57:24+5:302021-06-05T21:57:56+5:30
dangerous buildings नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात आहेत. अशा इमारतींचे मालक इमारतींची दुरुस्ती केल्याचा दावा करतात. यात सर्वाधिक ९७ जीर्ण इमारती गांधीबाग भागात आहे. नेहरूनगर झोन क्षेत्रात ५० हून अधिक अशा इमारती आहेत. यातील काही इमारती राहण्यासाठी धोकादायक आहेत. परंतु, नाइलाज असल्याने येथे शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत.
जीर्ण इमारती संदर्भाने प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विभागीय कार्यालयांनी मालकांना जीर्ण इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात आहेत, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. यातील काही इमारती दुरुस्त करण्याजोग्या नसल्याने त्या पाडण्याशिवाय पर्याय नाही. अशा अति धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा व वीज खंडित करावी अशी सूचना प्रशासनाने संबंधित विभागांना केली आहे.
दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?
जीर्ण इमारत मालकांना वेळोवेळी नोटीस बजावल्या जातात. यातील काही मालकांनी इमारतींची दुरुस्ती केली. परंतु, अजूनही अनेक इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण इमारत पडून दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्याय नसल्याने वास्तव्य
इमारत जीर्ण झाली. दुरुस्तीची गरज आहे. अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. परंतु, इमारत दुरुस्त करण्यासाठी पैसा नाही. आर्थिक अडचणीमुळे जीव धोक्यात घालून नाइलाजाने येथे राहावे लागते, अशी प्रतिक्रिया या इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी दिली.
मनपाकडून धोकादायक इमारतींचा सर्वे
दोन वर्षांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला. यात तीन दशकांपूर्वी बांधलेल्या २० हजारांहून अधिक इमारती आहेत, तर सहा दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींची संख्या चार हजारांहून अधिक आहे.
मनपा कायद्याच्या कलम २६५ नुसार जीर्ण इमारत दुरुस्तीची जबाबदारी ही घर मालकांची आहे.
९३ इमारत मालकांना नोटीस
नागपूर शहरातील १७० धोकादायक इमारतीपैकी ९३ इमारती अतिधोकादायक असल्याने गेल्या वर्षी या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी झोन कार्यालयाकडून धोकादायक इमारतींना दरवर्षी नोटीस बजावली जाते. परंतु, यातील बहुसंख्य इमारतीवर कारवाई झालेली नाही. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.