१७० खेळाडूंनी दिली खो-खो साठी चाचणी
By आनंद डेकाटे | Published: April 25, 2024 02:57 PM2024-04-25T14:57:05+5:302024-04-25T14:59:01+5:30
Nagpur : कीर्ती चाचणीला तिसऱ्या दिवशीही उत्तम प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘कीर्ती' उपक्रम अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खो-खो खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी गुरुवारी पार पडली. विद्यापीठाच्या रविनगरातील क्रीडांगणावर खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून आयोजित असलेल्या निवड चाचणीसाठी तिसऱ्या दिवशी दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. विविध परिसरातील १७० खो-खो पटूंनी निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून कीर्ती उपक्रम अंतर्गत तिसऱ्या दिवशी खो-खो या खेळातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यासाठी शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी घेण्यात आली. या चाचणीकरिता १११ मुले व ५९ मुली अशा एकूण १७० खेळाडूंनी सहभाग घेतला. या चाचणीकरिता नागपूरसह, वर्धा, चंद्रपूर, वरोरा, भंडारा, सावनेर, काटोल, बालाघाट (मध्य प्रदेश), खापरखेडा आदी शहरातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
चाचणी दरम्यान विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव सुधीर निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, माजी संचालक डॉ. धनंजय वेळूकर, भारतीय खेळ प्राधिकरणाच्या निरीक्षक भावना सुतार, समितीतील सदस्य डॉ. आदित्य सोनी, डॉ. मनोज आंबटकर, डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. नितीन जंगिटवार, डॉ. अमित टेंभूर्णे, डॉ. सुधीर सहारे, डॉ भरत मेहता, सायली वाघमारे, अर्चना कोट्टेवार, गणेश वाणी, नितीन धाबेकर यांची उपस्थिती होती.
- आज व्हॉलीबॉल चाचणी
व्हॉलीबॉल (मुले-मुली) या खेळ प्रकाराकरीता शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता निवड चाचणीस प्रारंभ होणार आहे. यापूर्वी खेळाडूंची
शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी होणार आहे.