१७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान!
By admin | Published: January 19, 2016 04:08 AM2016-01-19T04:08:13+5:302016-01-19T04:08:13+5:30
आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे प्रमुख स्रोत अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न
मालमत्ता विभाग वसुलीत मागे : उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागाची धावपळ
नागपूर : आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे प्रमुख स्रोत अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मालमत्ता विभागाच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु २८६ कोटींच्या डिमांडपैकी १७ जानेवारीपर्यंत जेमतेम ११५ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१६ पर्यंत कर आकारणी व कर संकलन विभागापुढे १७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे.
मालमत्ता करापासून २०१५-१६ या वर्षात २७० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु कर आकारणी पद्धतीच्या घोळामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. वसुलीसाठी झोननिहाय वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु दिलेले उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे. याला काही कारणे आहेत. शहरातील साडेपाच लाख मालमत्तांचे फेरमूल्यांकन झालेले नाही. एप्रिल २०१६ पासून नवीन कर आकारणीची सुरुवात न करता मध्येच या पद्धतीनुसार कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील काही मालमत्ताधारकांना जुन्या पद्धतीने तर काहींना नवीन पद्धतीने देयके पाठविण्यात आली आहेत. याचाही वसुलीवर परिणाम होणार आहे. मालमत्ता विभागातील रिक्त पदांचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. परंतु सर्वेक्षणाच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.
मालमत्ता कर वसुलीचे झोननिहाय तसेच निरीक्षकांना कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी काही झोनकडून चांगला प्रतिसाद आहे. परंतु काही झोनमध्ये उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही. कर आकारणीचा गोंधळ सुरू असल्याने वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही. एलबीटी रद्द करण्यात आल्याने महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु तांत्रिक अडचणी व अभ्यासू कर्मचाऱ्यांची विभागात कमतरता असल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)
झोन डिमांड (कोटी) वसुली (कोटी)
लक्ष्मीनगर ३९.०५ २२.११
धरमपेठ ५९.३१ १७.००
हनुमाननगर २८.०८ १३.६०
धंतोली १५.५५ ८.३४
नेहरूनगर २५.१३ ९.६१
गांधीबाग १०.८३ ५.७०
सतरंजीपुरा १३.४७ २.९८
लकडगंज ३७.९७ १२.१२
आशीनगर २६.२६ ०९.००
मंगळवारी २९.७८ १५.२०
एकूण २८६ ११५.६६