१७५ आॅटोरिक्षा जप्त
By admin | Published: January 28, 2017 01:42 AM2017-01-28T01:42:08+5:302017-01-28T01:42:08+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या तीन दिवसांत खासगी आॅटोरिक्षांवर कारवाई करीत १७५ आॅटोरिक्षा जप्त करण्यात आल्या.
आरटीओची खासगी आॅटोंवर कारवाई
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या तीन दिवसांत खासगी आॅटोरिक्षांवर कारवाई करीत १७५ आॅटोरिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई आणखी काही दिवस चालणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांचे म्हणणे आहे.
ओला, उबेरसारख्या कॅब सुविधाने कमी वेळात शहरात चांगलाच जम बसविला आहे. थेट घरापासून सेवा मिळत असल्याने अनेक प्रवासी आॅटोकडून या कॅबसुविधेकडे वळले आहे. दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. याला घेऊन काही दिवसांपूर्वी आॅटोचालक संघटनांनी आंदोलन केले.
याची दखल घेत मंगळवारपासून आरटीओने अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती घेतली. यात पहिल्या दिवशी १२५ तर दुसऱ्या दिवशी ५० खासगी आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली. ही सर्व वाहने खासगी असताना मोठ्या संख्येत प्रवासी वाहतूक करीत होते. यातील ज्या वाहनावर सलग तीन चालान झाले असल्यास ते वाहन नष्ट करण्याची प्रक्रियाही परिवहन विभागाकडून राबवण्यात येणार आहे.
या कारवाईकरिता शहर वाहतूक विभागाचीही मदत आरटीओकडून घेण्यात आली होती.
ही कारवाई शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, पोलीस उपायुक्त (वाहतूक) स्मार्तना पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात संजय पेंढारकर, बच्छराव, पल्लेवार, संजीवनी चोपडे, बच्छाव, चोपडे, केदार, इरपाते, तोमस्कर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)