नागपूरच्या इंडियन ओव्हरसिज बँकेत पावणेदोन कोटींचा कर्ज घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 08:19 PM2018-07-05T20:19:50+5:302018-07-05T20:24:46+5:30
पावणेदोन कोटींच्या कर्जघोटाळा प्रकरणात अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दोघांच्या मुसक्या बांधल्या. विवेक शरद दिवाण (रा. महाल, नागपूर) आणि रवींद्र पोटदुखे अशी आरोपींची नावे आहेत. इंडियन ओव्हरसिज बँकेच्या इमामवाडा शाखेत बनावट कागदपत्राद्वारे वाहनासाठी कर्ज प्रकरण सादर करून १६ आरोपींनी बँकेला १ कोटी, ७३ लाखांचा गंडा घातला होता. या कर्ज घोटाळ्यात बँकेच्या तीन अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावणेदोन कोटींच्या कर्जघोटाळा प्रकरणात अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दोघांच्या मुसक्या बांधल्या. विवेक शरद दिवाण (रा. महाल, नागपूर) आणि रवींद्र पोटदुखे अशी आरोपींची नावे आहेत.
इंडियन ओव्हरसिज बँकेच्या इमामवाडा शाखेत बनावट कागदपत्राद्वारे वाहनासाठी कर्ज प्रकरण सादर करून १६ आरोपींनी बँकेला १ कोटी, ७३ लाखांचा गंडा घातला होता. या कर्ज घोटाळ्यात बँकेच्या तीन अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.
वाहन घेण्यासाठी कर्ज प्रकरण सादर करायचे. त्यासाठी बहुतांश कागदपत्रे बनावट तयार करायची. याच कागदपत्रांच्या आधारे दुसºया बँकेत आॅटोमोबाईल्स कंपनीच्या (कार वितरक) नावे खाते उघडायचे. वाहन कर्जाच्या रकमेचा डीडी बँक अधिकाºयांकडून मिळताच तो कार वितरक म्हणून स्वत:च्याच खात्यात जमा करायचा. वाहन घ्यायचेच नाही. मात्र, वाहन घेतल्याचे कागदोपत्री भासवून कर्जाची रक्कम हडप करायची. नंतर बँकेकडे फिरकून पहायचे नाही, असा या आरोपींचा फंडा होता. त्याआधारे त्यांनी इंडियन ओव्हरसिज बँकेत वाहन कर्जाची तब्बल १६ प्रकरणे सादर करून १ कोटी, ७३ लाखांची रोकड उचलली होती. कर्ज घेणाºया या आरोपींनी स्वत:च थापर सन्स मोटर्स, स्टार मोटर्स, सेंट्रल मोटर्स नावाने विविध बँकेत खाते उघडले होते. विशेष म्हणजे, या फसवणूक प्रकरणात बँक अधिकाºयांचाही आरोपींसोबत सहभाग होता. त्यामुळे बरेच दिवस या घोटाळ्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, पावणेदोन कोटींचा हा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेकडे त्याचा तपास आला.
अखेर गुन्हे दाखल
पोलिसांकडे या प्रकरणाची २०१७ मध्ये तक्रार झाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विशाल काळे, तसेच त्यांचे सहकारी जितेंद्र धीरज यांनी तपास केला. या घोटाळ्यात बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश भांडारकर, सह व्यवस्थापक गोपीचंद खांडेकर आणि प्रणाली बगल या तिघांसह १९ आरोपींचा समावेश असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी धरपकड सुरू केली. आतापावेतो १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. बुधवारी विवेक दिवाण आणि रवींद्र पोटदुखे या दोघांना अटक करण्यात आली.
त्यापैकी दिवानची न्यायालयाने कारागृहात (एमसीआर) रवानगी करण्याचे आदेश दिले. त्याच्याविरुद्ध सुमारे १५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप आहे. तर, पोटदुखेविरुद्ध १० लाखांच्या फसवणुकीचा आरोप होता. त्याला अटक करून पोलिसांनी त्याचा ९ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.