नागपुरात २६ दिवसांत डेंग्यूचे १७७ रुग्ण, ३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 11:58 PM2021-07-30T23:58:50+5:302021-07-30T23:59:24+5:30
dengue patients कोरोनातून दिलासा मिळत नाही तोच डेंग्यूची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी ते आतापर्यंत २७५ रुग्ण आढळून आले असून, यातील १७७ रुग्ण मागील २६ दिवसांतील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनातून दिलासा मिळत नाही तोच डेंग्यूची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी ते आतापर्यंत २७५ रुग्ण आढळून आले असून, यातील १७७ रुग्ण मागील २६ दिवसांतील आहेत. यातच जून महिन्यात झालेल्या ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद या महिन्यात घेण्यात आली आहे.
डेंग्यूचा आजार झपाट्याने फैलावत आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने १६ जुलैपासून विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. मागील १४ दिवसांत ९१ हजार ५०९ घरांची तपासणी करण्यात आली. यात तब्बल ५६४७ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. ही धोकादायक स्थिती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होत असताना जानेवारी महिन्यात शहरात डेंग्यूचे केवळ दोन रुग्ण होते. फेब्रुवारी महिन्यात एक, मार्च महिन्यात तीन, एप्रिल महिन्यात शून्य, मे महिन्यात सहा रुग्ण आढळून आले. जून महिन्यात कोरोनाची लाट ओसरताच डेंग्यूच्या ८६ रुग्णांची नोंद झाली, तर २६ जुलैपर्यंत १७७ रुग्णांची भर पडली. नुकत्याच झालेल्या ‘डेंग्यू डेथ ऑडिट समिती’च्या बैठकीत जून महिन्यातील तीन रुग्णांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाले.
नासुप्रच्या जलतरण तलावातही डेंग्यूच्या अळ्या
डेंग्यूच्या सर्वेक्षण मोहिमेत घरघरे दूषित आढळून येत असताना शुक्रवारी अंबाझरी ले-आऊट येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावातही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित औषध टाकून अळ्या नष्ट केल्या. सोबतच अंबाझरी ले-आऊटच्या संपूर्ण परिसराची पाहणीही केली.
दोषींवर कारवाई कधी?
घराघरातील सर्वेक्षण वर्षभरापासून सुरू आहे. त्याचत्याच घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येऊन परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आणला जात आहे. असे असताना महानगरपालिकेतर्फे एकाही घर मालकावर कारवाई झाली नाही. जनजागृतीसोबतच कारवाई झाल्यास डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कूलर ठरत आहे डासांच्या उत्पत्तीचे केंद्र
मनपाच्या वतीने सुरू असलेल्या डेंग्यू सर्वेक्षण मोहिमेत गुरुवारी व शुक्रवारी १३,५३९ घरांची तपासणी करण्यात आली. यात ७०० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. सर्वेक्षणात सर्वाधिक अळ्या कूलरमध्ये आढळून आल्या. यामुळे कूलर डासांचे उत्पत्तीचे केंद्र ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डेंग्यूची वाढती संख्या धोकादायक
जानेवारी : ०२
फेब्रुवारी : ०१
मार्च : ०३
एप्रिल : ००
मे : ०६
जून : ८६
जुलै : १७७