नागपुरात १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; २२१७ अॅक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:12 AM2020-08-04T10:12:24+5:302020-08-04T10:12:47+5:30
नागपुरात सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक १८ रुग्णांना जीव गमवावा लागला. एका दिवशी कोरोनाने मृत्यू पडणाऱ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरुच आहे. सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक १८ रुग्णांना जीव गमवावा लागला. एका दिवशी कोरोनाने मृत्यू पडणाऱ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आॅगस्टमध्ये सुरुवातीच्या तीन दिवसातच ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच नागपुरातील कोरोना मृत्यूची संख्या १७२ वर पोहोचली आहे. तर सोमवारी २४६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. नागपुरात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,१४३ वर पोहोचली असून आतापर्यंत ३,७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी शहरात १८० आणि ग्रामीणमध्ये ६६ नवीन पॉझिटिव्ह आढळून आले. १३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या २,२१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मेडिकलमध्ये सोमवारी वानाडोंगरी येथील ६५ वर्षीय महिला, कामठीतील ५० वर्षीय महिला, हिंगण्यातील ५० वर्षीय महिला, सूर्यनगर येथील ७२ वर्षी. पुरुष, धरमपेठ येथील ४९ वर्षीय पुरुष, गरोबा मैदान येथील ४५ वर्षीय पुरुष, भालदारपुरा येथील ६२ वर्षीय महिला आणि टिमकी येथील ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मेयो रुग्णालयात दहेगाव येथील ६२ वर्षीय महिला, यशोदानगर येथील ३५ वर्षीय पुरुष, अंसारनगर येथील २८ वर्षीय महिला, जरीपटका येथील ६८ वर्षीय पुरुष आणि दत्तवाडी येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. यात बहुतांश मृतांना मधुमेह, बीपी, न्युमोनिया यांची समस्या होती. उर्वरित ५ रुग्णांचा मृत्यू कुठे झाला याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून उपलब्ध करण्यात आलेली नाही. सोमवारी ग्रामीणमध्ये ५ आणि नागपूर शहरात १३ मृत्यू झाले.
सोमवारी मेयोच्या प्रयोगशाळेत ६२, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ७७, एम्सच्या प्रयोगशाळेत ४८, माफसूच्या प्रयोगशाळेत १६, खासगी प्रयोगशाळेत १५ आणि अॅण्टिजेन टेस्टमध्ये २८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. आज एकूण १७०९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात ८७,३४४ नमुने तपासण्यात आलेले आहेत.