१८ कोटींच्या वणी-पाटण रस्ता रुंदीकरणाची संथगती
By admin | Published: April 11, 2016 02:31 AM2016-04-11T02:31:09+5:302016-04-11T02:31:09+5:30
वणी-मुकुटबन-बोरी-पाटण या १८ कोटी ७० लाखांचे बजेट असलेल्या रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.
यवतमाळ : वणी-मुकुटबन-बोरी-पाटण या १८ कोटी ७० लाखांचे बजेट असलेल्या रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. निविदेतील अटीनुसार बॅचमिक्स प्लॅन्ट लागला नाही. पर्यायाने डांबरीकरण रखडले आहे. नांदेडच्या या कंत्राटदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता मेहेरबान असल्याचे सांगितले जाते.
राज्य मार्ग क्र. ३१५ वर वणी ते पाटण या दहा किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाची केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) निविदा काढली गेली. सात कंत्राटदारांनी ही निविदा भरली होती. १९ आॅक्टोबर २०१५ ला निविदा उघडण्यात आल्या. त्यात नांदेड येथील एकलारे यांच्या शारदा कंन्स्ट्रक्शनची १४.५७ टक्के तर उंबरकर-औदार्य संयुक्त कंपनीची ११.९८ टक्के कमी दराची निविदा होती. अखेर शारदा कंस्ट्रक्शनला हे काम देण्यात आले.
नोव्हेंबरमध्येच त्याचे कार्यादेश जारी करण्यात आले. तीन महिन्यात अर्थात फेब्रुवारी २०१६ पर्यंत सदर कंत्राटदाराने बॅचमिक्स प्लॅन्ट उभारण्याची हमी निविदेत दिली होती. त्यापोटी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमही (एफडीआर) निविदेसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. मात्र निर्धारित तीन महिन्यात शारदा कंस्ट्रक्शनचा प्लॅन्ट उभा राहिला नाही. अखेर बांधकाम खात्याने ती दहा लाखांची रक्कम जप्त केली. त्यानंतर नियमानुसार दुसऱ्या स्पर्धकाला हे काम देणे किंवा पुन्हा निविदा बोलविणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात तसे न करता उलट शारदा कंस्ट्रक्शनलाच दोन महिने अर्थात एप्रिलपर्यंत प्लॅन्ट उभारणीसाठी मुदत वाढवून देण्यात आली.
यवतमाळ-अमरावती मार्गे गेलेल्या या प्रस्तावाला मुंबईत मंजुरी देण्यात आली. मात्र आता एप्रिल महिना अर्ध्यावर येऊनही प्लॅन्ट स्थापण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या दहा किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सध्याच या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम न झाल्यास या मार्गावरून धावणे वाहनांना कठीण होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नांदेडच्या कंत्राटदारांसाठी पांढरकवड्यात सॉफ्टकॉर्नर
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता के.आर. पाटील हे नांदेडवरून बदलून आले आहेत. त्यामुळे नांदेडच्या कंत्राटदारांचा पांढरकवड्यात कामे घेण्यासाठी शिरकाव वाढला आहे. आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नसल्याने स्थानिक कंत्राटदारांना कामे मिळणे कठीण झाले आहे. त्यातच नांदेडवरून जाणीवपूर्वक कंत्राटदार आयात केले जात असल्याने स्थानिक कंत्राटदारांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळतो आहे. नांदेडच्या अनेक कंत्राटदारांनी निविदा भरल्या. त्यात ते पात्र ठरले नाही ही वेगळी बाब. नांदेडच्या कंत्राटदारांसाठी पांढरकवडा बांधकाम विभागात खास ‘सॉफ्टकॉर्नर’ ठेवला जात आहे. नांदेडच्या कंत्राटदाराला मिळालेले हे पहिलेच १८ कोटींचे काम वादग्रस्त ठरले आहे. हे काम वेळेत पूर्ण करून घेण्याचे आव्हान बांधकाम विभागापुढे आहे.
निविदा मंजूर झाल्यापासून पाच महिन्यात वणी-पाटण मार्गाचे दरमहा एक कोटी प्रमाणे किमान पाच कोटी रुपयांचे काम होणे बंधनकारक होते. मात्र प्रत्यक्षात केवळ डब्ल्यूबीएमचे काम झाले आहे. त्यापोटी एक कोटी २० लाख रुपयांची रक्कम (७०-५० लाख) कंत्राटदाराला अदाही करण्यात आली. वास्तविक निविदेतील नियोजनानुसार काम न करणाऱ्या या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई अपेक्षित होती. परंतु पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘नांदेड कनेक्शनपोटी’ या दंडात्मक कारवाईला बगल दिली.