नागपुरातील आमदार निवासजवळ १८ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:30 AM2020-06-02T00:30:55+5:302020-06-02T00:32:54+5:30
दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिंगल कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयातील तसेच खासगी व्यक्तींकडील रक्कम संकलित करून ती बँकेत अथवा एटीएममध्ये जमा करण्याचे कंत्राट घेतले आहे. कंपनीचे कर्मचारी विविध ठिकाणाहून रोकड गोळा करून ती दररोज बँकेत जमा करतात. नेहमीप्रमाणे श्रीकांत नानाजी इंगळे (वय ३७) आणि सतीश धांदे या दोन कर्मचाऱ्यांनी आज विविध ठिकाणाहून दोन लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर ते शंकरनगरातील एलआयसी आॅफिसमध्ये आले. इथून त्यांनी १६ लाखाची रोकड उचलली. अशाप्रकारे एकूण १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड अॅक्सिस बँकेत जमा करण्यासाठी
इंगळे आणि धांदे एका दुचाकीवर निघाले. आमदार निवासजवळच्या राजाराणी चौकात येताच मागून तीन दुचाकीवर आलेल्या सहा लुटारूंपैकी एकाने लाथ मारून दुचाकीवरील कर्मचाऱ्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळची रोकड असलेली बॅग हिसकावून लुटारू पळून गेले. या घटनेमुळे हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीच्या वरिष्ठांना लुटमारीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष आणि सीताबर्डी पोलिसांना माहिती कळविण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटमारीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. सीताबर्डीचा पोलीस ताफा, परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे पीडित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. इंगळेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात सहा आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कुणी दिली टीप?
आरोपींचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले. एकूणच घटनाक्रमावरून आरोपींना इंगळे आणि धांदेकडे मोठी रोकड असल्याची माहिती आधीपासूनच होती आणि त्यामुळे लुटमारीचा कट आरोपींनी काही दिवसांपूर्वीच रचला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. दरम्यान, इंगळे आणि धांदे हे रोज मोठी रोकड घेऊन दुचाकीने जातात, ही माहिती आरोपींना देणारा कोण, असा प्रश्न उपस्थित झाला असून, या प्रश्नातच या दरोड्याचे उत्तर दडले असल्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी चालविला आहे.