१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:39 AM2017-10-16T00:39:41+5:302017-10-16T00:39:52+5:30
पोलिसांनी कारगाव फाट्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. ट्रकचालकासह अन्य आरोपी मात्र पळून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : पोलिसांनी कारगाव फाट्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. ट्रकचालकासह अन्य आरोपी मात्र पळून गेले. या कारवाईमध्ये ट्रकमधील ४० जनावरांची सुटका करण्यात आली असून, एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
भिवापूर परिसरातून ट्रकमध्ये जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती भिवापूर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी नागपूर - गडचिरोली मार्गावरील कारगाव फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, गडचिरोलीहून नागपूरच्या दिशेने जाणारा सीजी-२३/बी-०१४५ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकास समोर पोलीस असल्याचे निदर्शनास येताच त्याने हा ट्रक अलीकडेच काही दूर अंतरावर उभा केला आणि त्याच्यासह अन्य आरोपींनी ट्रक सोडून लगेच पळ काढला.
पोलिसांनी या ट्रकची झडती घेतली असता, त्यात ४० जनावरे कोंबली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असावी, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी ट्रकमधील सर्व जनावरांची सुटका करून त्यांना नजीकच्या गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था केली तसेच ट्रक जप्त केला. या कारवाईमध्ये ट्रक आणि जनावरे असा एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पसार आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.
ही कारवाई ठाणेदार हर्षल येकरे यांच्या मार्गदर्शनात कारवाई पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर तिवारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक दौलत नैताम, चंदू रेवतकर, विनोद झाडे, उमेश झिंगरे, योगीराज वंजारी, प्रकाश मुरकूटे, गोकुळ सलामे, राजन भोयर, विनोद भोयर, अमोल तायडे, सारंग राखडे यांनी पार पाडली.
२० जनावरांची सुटका
मौदा : पोलिसांनी माथनी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यातील २० जनावरांची सुटका करून दोघांना अटक करीत त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. नीलेश टेकराम कुथे (३४) व हंसराज शामराव बोरकर (४०) दोघेही रा. आमगाव, जिल्हा गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मौदा परिसरातून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी नागपूर - भंडारा महामार्गावरील माथनी शिवारात वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-३५/के-११०५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २० म्हशी आणि रेडे कोंबले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या जनावरांची वाहतूक ही विनापरवानगी असल्याचे तसेच ही जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चौकशीदरम्यान आढळून येताच पोलिसांनी जनावरांसह ट्रक जप्त करून त्यातील दोघांना अटक केली. या कारवाईमध्ये एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.