३८ महिन्यांत उपराजधानीतील १८,३३८ नागरिक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:26 AM2018-04-09T10:26:27+5:302018-04-09T10:26:39+5:30
उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील १६ हजारांहून अधिक जण सापडले असले तरी दोन हजार जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यात अल्पवयीन मुले, मुले व ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस विभागाकडे बेपत्ता झालेल्या नागरिकांविषयी विचारणा केली होती.
१ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत किती नागरिक हरविले, किती जणांचा शोध लागला, यात मुले, मुली यांचा किती प्रमाणात समावेश होता, तसेच ‘आॅपरेशन मुस्कान’ला किती प्रमाणात यश मिळाले. इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत शहरात १८ हजार ३३८ नागरिक बेपत्ता झाले. यातील १६ हजार १७४ नागरिक सापडले. १०९ प्रकरणात बेपत्ता झालेले नागरिक मृत सापडले. परंतु २ हजार ५५ नागरिकांचा शोध लागलेला नाही. शहर पोलिसांनी बेपत्ता नागरिकांसाठी ‘सेल’ सुरू केल्यापासून १ हजार ६५ नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यात ५४ मुले, ८७ मुली यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, या कालावधीत पोलिसांकडे ६७७ ज्येष्ठ नागरिक हरविल्याच्या तक्रारी आल्या.
‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये ६४ जणांचा शोध
नागपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविले होत. १ जानेवारी २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत २८ अल्पवयीन मुले तर ३६ अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश आले.