नागपुरात १८ कामगारांना अन्नातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:43 AM2019-05-30T10:43:25+5:302019-05-30T10:44:51+5:30
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मोरारजी टेक्स्टाईल कंपनीत आशिष मिश्रा यांच्या दुर्गा गणेश केटरिंग सर्व्हिसला खानावळीचे कंत्राट आहे. या खानावळीत जेवण पुरविणे आणि स्वच्छतेचे काम उमेश पांडे हा बघतो. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान कंपनीचे कामगार जेवण करीत असताना अनिल गिºहे (४२) रा. हिंगणा यांच्या जेवणाच्या ताटातील वरणामध्ये मृत पाल आढळून आली. तोपर्यंत खानावळीत उपस्थित असलेल्या अनेक कामगारांनी जेवण करणे सुरू केले होते. परंतु अनिल गिºहे यांना जेवणात पाल आढळून येताच त्याने इतर सहकारी कामगारांना याबाबत अवगत केले. अन्नात पाल पाहून अनिल याने ओकारी केली. यानंतर इतर कामगारांनीही ओकाऱ्या करायला सुरुवात केली. जवळपास १८ कामगारांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यात मनोहर नारायण खंदारे (४२) रा. तुरकमारी, रवींद्र विठोबा निमकर (३३) रा. देवळी आमगाव, रमेश गुरनुले (४० ), ज्ञानेश्वर माहुरे (३८) रा. घोराड, विजय येलूरे (४०) रा. कान्होलीबारा, देविदास कावळे (४८) रा. टाकळघाट, अमोल पांडे (३८) रा. बुटीबोरी, मनोज जिव्हारे(४३) रा. बुटीबोरी, विकास बेलेकर(४४) रा. सातगाव, रमेश करडभाजने (३१) सालईदभा, अजय बनकर (२९) रा. शिरुळ , रामेश्वर बोपचे (३९) रा. बोथली, संजय शरणागत (२९) रा. बुटीबोरी, मोहन नाटेकर (३२) रा. बुटीबोरी, शैलेश ढबाले (२२) रा. सालईदाभा, ज्ञानेश्वर ठाकरे (४०) रा. कान्होलीबारा, दिलीप उरकुडे (४०) रा. कान्होलीबारा यांचा यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी एमआयडीसीचे ठाणेदार सुनील लांघी ताफ्यासह कंपनीत दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून विषबाधित कामगारांना बुटीबोरी येथील रचना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील १० कामगारांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. अन्नाचा रासायनिक विश्लेषकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील लांघी यांनी दिली.