महाराष्ट्राचा संकल्प गुप्ता बनला भारताचा ७१ वा 'ग्रँडमास्टर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 11:59 AM2021-11-11T11:59:23+5:302021-11-11T12:12:57+5:30
सर्बियातील तीन बुद्धीबळ स्पर्धांमध्ये २५०१ येलो रेटिंग संपादीत करत, नागपुरच्या संकल्प गुप्ताने भारताचा ७१ वा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान मिळवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्बियातील तीन बुद्धीबळ स्पर्धांमध्ये २५०१ येलो रेटिंग संपादीत करत, १८ वर्षांचा युवा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने भारताचा ७१ वा आणि नागपुरचा दुसरा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान मिळवला आहे. सलग तीन स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संकल्पने अवघ्या २४ दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले.
नागपुरात परत आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना संकल्प म्हणाला, ‘ २००८ मध्ये लहान-लहान स्पर्धांपासून सुरू झालेला हा प्रवास ‘ग्रॅन्डमास्टर’पर्यंत पोहोचला आहे. यापुढेही २०२२च्या अखेरपर्यंत २६०० रेटिंग पूर्ण करण्याची आणि पाठोपाठ २७०० रेटिंगसह ‘सुपर ग्रॅन्डमास्टर’ होण्याचा निर्धार कायम असेल. महाराष्ट्रात विदित गुजराथी हा एकमेव सुपर ग्रॅन्डमास्टर आहे.
संकल्पने अवघ्या २४ दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले. अरांदजेलोवाक शहरात झालेल्या तिसऱ्या स्पर्धेत आवश्यक साडेसहा गुणांची कमाई करताच संकल्पचे स्वप्न साकार झाले. यानंतर, तो २०२२ पर्यंत २६०० यलो रेटिंग मिळवू इच्छितो. पाठोपाठ २७०० रेटिंगसह ‘सुपर ग्रॅन्मास्टर’ बनायचाची संकल्पचा ध्यास आहे.
संकल्प म्हणाला, ‘माझ्या वाटचालीत नयनदीप कोटांगळे, गुरुप्रीतसिंग मरास यांचे प्रमुख योगदान राहिले. लॉकडाऊनमध्ये तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला. सर्बियाकडे निघताना निर्धार केला होता. लक्ष्य कठीण वाटत होते पण विश्वास कायम होता. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि कुटुंबाच्या भक्कम आधारामुळे हे यश साकार झाले.’
या यशात नागपूर आणि विदर्भातील बुद्धिबळाचा किती वाटा आहे, या प्रश्नाच्या उत्तरात संकल्प म्हणाला, ‘बुद्धिबळाप्रति आता जाणीव निर्माण होऊ लागली. सरकारचाही चांगला पाठिंबा लाभतो. नागपूरसह विदर्भात खेळाच्या अनेक स्पर्धांचे आयोजन होत असल्याने माझ्यासह नव्या दमाचे खेळाडू पुढे येत आहेत.’
या खेळात सारखे बसावे लागत असल्याने जीम आणि योग असा व्यायाम आवश्यक ठरतो, असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी येथे बीबीएच्या प्रथम वर्षाला शिकणारा संकल्प म्हणाला, ‘खेळामुळे अभ्यासातील एकाग्रता वाढली आहे. लवकरच ब्लीट्झ आणि रॅपिड प्रकारातही स्पर्धा खेळणे सुरू करणार आहे.’ संकल्पला आर्थिक विषयांच्या अभ्यासात विशेष ऋची आहे.
संकल्पने ‘ग्रॅन्डमास्टर’ होण्याचा मान मिळवताच दिग्गज विश्वनाथन आनंद याने ट्विट करत संकल्पचे कौतुक केले, शिवाय शंभराव्या ग्रॅन्डमास्टरपर्यंत कधी पोहोचणार?’ अशी सूचक विचारणा केली होती. याविषयी विचारताच संकल्पने आनंदसाख्या दिग्गजाकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावल्याचे सांगितले. पुढील पाच वर्षांत देशाला शंभर ग्रॅन्डमास्टर मिळतील, अशी अपेक्षादेखील संकल्पने व्यक्त केली.
पराभूत होताच संकल्प रडायचा : संदीप गुप्ता
संकल्पचे वडील संदीप गुप्ता म्हणाले, ‘२००९ला मी संकल्पला जळगावला स्पर्धा खेळण्यासाठी घेऊन गेलो. तेथे पराभव होताच तो रडायला लागला. त्यावेळी माझ्यासह कुटुंबियांनी त्याची समजूत काढली. तेव्हापासून मात्र त्याच्यातील विजिगिषु वृत्ती जागी झाली. तो लवकरच सुपर ग्रॅन्डमास्टर बनेल, असा विश्वास वाटतो.’
संकल्प विजयासाठीच खेळतो - सुमन गुप्ता
संकल्प हा बालपणापासून कुठल्याही स्पर्धेत केवळ विजयी निर्धाराने खेळतो. तो स्वत:ला झोकून देत प्रतिस्पर्धी खेळाडूला संधी देत नाही. त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाली आहे. प्रत्येकवेळी त्याच्यासोबत वावरल्यामुळे त्याच्यातील संयमी वृत्तीचे हे फळ असल्याची भावना आई सुमन गुप्ता यांनी व्यक्त केली.