शाळाबाह्य १८० बालकांना शाेधण्यात यश
By निशांत वानखेडे | Published: May 4, 2024 05:13 PM2024-05-04T17:13:07+5:302024-05-04T17:16:20+5:30
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभियान : शाळा प्रवेशाची प्रक्रिया निश्चित केली
नागपूर : जिल्ह्यात शाळाबाह्य मुले अत्यल्प आहेत, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्यातील फाेलपणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष अभियानातून समाेर आला आहे. प्राधिकरणाच्या स्वयंसेवकाच्या विशेष पथकाने नागपूर जिल्ह्यात तब्बल १८० शाळाबाह्य मुलांचा शाेध घेण्यात यश मिळविले आहे. धक्कादायक म्हणजे त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.
नागपूर जिल्ह्यातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे सचिव न्या. सचिन पाटील यांनी तीन विधी स्वयंसेवकांचे पथक स्थापन केले आहे. यामध्ये विधी स्वयंसेवक मुकुंद अडेवार, मुशाहीद खान व राजरतन वानखेडे यांचे पथक जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांचा समावेश आहे. या पथकाने नागपूर शहर व ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या, झोपडपट्टी, आदिवासी पाडे आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये शाेध घेतला. मोहिमेत शहरातील १०२ व ग्रामीण भागातील ७८ अशा एकूण १८० शाळाबाह्य बालकांचा शाेध घेऊन शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली. त्यामध्ये कधीही शाळेत न गेलेले ५५ आणि मध्येच शाळा सोडलेले १२५ मुला मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३ मुले व २ मुली अपंग आहेत.
मुलींचे प्रमाण लक्षणीय
सर्वेक्षण करतेवेळी शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे मुकुंद अडेवार यांनी सांगितले. या मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला. तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देणेसाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गौतमनगर, गिट्टीगोदाम येथील दोन एकल पालक मुलींना शासनाच्या सावित्रीबाई फुले संगोपन योजनेची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधी स्वयंसेवक पथकाने मदत केली. तसेच मुलांकरीता असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजनांची देखील पालकांना माहीती देण्यात आली.