विदर्भात होणार १८० वाहन चार्जिंग स्टेशन; नागपूर १५० तर अमरावती शहरात ३०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 12:07 PM2022-06-22T12:07:18+5:302022-06-22T13:09:30+5:30
महावितरण कंपनीने राज्यात आतापर्यंत १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केले आहे.
नागपूर : इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता महावितरण कंपनीकडून चार्जिंग स्टेशन वाढविले जाणार आहेत. संपूर्ण राज्यभरात आणखी २,३७५ स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये विदर्भात नागपूर शहरात १५० आणि अमरावती शहरात ३० स्टेशनचा समावेश आहे.
सन २०२५ पर्यंत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रस्तावित स्टेशनमध्ये बृहन्मुंबई शहरात १,५००, पुणे ५००, नागपूर १५०, नाशिक १००, औरंगाबाद ७५, अमरावती ३० आणि सोलापूर शहरात २०, असे २,३७५ चार्जिंग स्टेशन प्रस्तावित केले आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टीम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतो. शिवाय राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता वीज वितरण कंपनीला राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. खासगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास महावितरणतर्फे प्राधान्याने वीजपुरवठा केला जाणार आहे.
सरकार देणार पैसा
राज्य शासनाने इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी वित्तीय प्रोत्साहन जाहीर केले आहे. निमसार्वजनिक चार्जिंग स्टेशन्ससाठी मंदगतीचे १५,००० चार्जर व मध्यम वेगवान चार्जर ५००, अशी एकूण १५,५०० चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी सुमारे ४० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याकरिता महावितरणमार्फत अद्ययावत वेबपोर्टल विकसित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
४९ ठिकाणची कामे प्रगतिवर
महावितरण कंपनीने राज्यात आतापर्यंत १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केले आहे. पूर्वीच हाती घेण्यात आलेली अतिरिक्त ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतिपथावर आहेत. यात नवी मुंबई १०, ठाणे ६, नाशिक व औरंगाबाद प्रत्येकी दोन, पुणे १७, सोलापूर २, नागपूर ६, कोल्हापूर २, अमरावती २, अशा चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे.