केरळातील पेट्रोलपंपावर गुंतवणूक, नागपुरकराला १.८१ कोटींचा गंडा
By योगेश पांडे | Published: February 9, 2024 09:49 PM2024-02-09T21:49:06+5:302024-02-09T21:49:18+5:30
जया फ्युएल्सच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर: ३० टक्के नफ्याचे आमिष दाखवत केरळमधील जया फ्लुएल्सच्या पेट्रोलपंपावर गुंतवणूक करायला भाग पाडत तीन आरोपींनी नागपुरकर गुंतवणूकदाराला १.८१ कोटींचा गंडा घातला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आर्थिक गुन्हे शाखेकडून आता तपास करण्यात येत आहे.
ललिश कुमार (तेलंगखेडी) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांना २०१२ मध्ये केरळ येथील जया फ्युएल्सच्या पेट्रोलपंपावर गुंतवणूक करण्याची योजना सांगण्यासाठी अल्लापुझा येथील थरमकुलम गावातील कन्ननकुझी मुरीतील विजयन पिल्लई, विजयाकुमारी विजयन पिल्लई व नझीम हनिफा रॉथर यांनी संपर्क केला. पेट्रोलपंपावर गुंतवणूक केली तर व्यवसायातील नफ्याच्या ३० टक्के पैसे देण्याचे त्यांनी आमिष दाखविले. लतिश कुमार यांनी वेळोवेळी दीड कोटींहून अधिकची गुंतवणूक केली.
नफ्यासह ही रक्कम १.८१ कोटी इतकी झाली होती. लतिश यांनी नफ्यासह रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्यांना १.८१ कोटींच्या रकमेचे दोन धनादेश दिले. दोन्ही धनादेश पुढील तारखांचे होते. संबंधित तारखांना लतिश यांनी धनादेश बॅंकेत टाकले असता ते ‘बाऊन्स’ झाले. त्यांनी यानंतर नवीन धनादेशदेखील पाठविले नाहीत व पैसेदेखील परत देण्याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लतिश कुमार यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
नागपुरातील इतरांचीही फसवणूक ?
केरळमधील या आरोपी त्रिकुटाने लतिशकुमार यांच्याप्रमाणे नागपूर व विदर्भातील इतरही लोकांना नफ्याचे आमिष दाखवत फसविले असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून त्या दिशेनेदेखील तपास सुरू आहे.
आरोपी दांपत्य दुबईला फरार ?
आरोपींपैकी विजयन पिल्लई, विजयाकुमारी हे पती पत्नी आहे. नागपुरात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच ते दुबईला निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध सुरू असून ते दुबईला गेले असतील तर त्यांना परत आणण्याचे प्रयत्न आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतील.