४८० सदनिकांसाठी आले १८१९ अर्ज; लवकरच होणार ऑनलाईन लॉटरी
By मंगेश व्यवहारे | Published: September 8, 2023 02:40 PM2023-09-08T14:40:54+5:302023-09-08T14:48:30+5:30
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आढावा बैठक घेवून लॉटरी संदर्भात निर्देश
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील सदनिकांची लवकरच ऑनलाईन लॉटरी केली जाणार आहे.
‘स्वप्ननिकेतन’ मध्ये ४८० सदनिका उभारण्यात आल्या आहेत. ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रकल्पात ५० टक्के अर्थात २४० सदनिका अराखीव असून १३ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमाती, ३० टक्के इतर मागास प्रवर्ग आणि ५ टक्के समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत.
प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा करणाऱ्या पंपला लागणारा वीज निर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर उर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, पर्जन्य जलसिंचन प्रकल्पाची सुविधा, जलनि:स्सारण इ. सुविधाचा समावेश आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा बैठक घेवून लॉटरी संदर्भात निर्देश दिले. प्रकल्पातील सदनिकेची अंदाजित किंमत ११,५१,८५४ रुपये असून, प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे २,५०,००० रुपये अनुदान असल्यामुळे सदनिकेचे विक्रीमुल्य ९,०१,८४५ रुपये आहे.