मास्क न वापरणाऱ्या ४१ हजार लोकांकडून १.८८ कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 03:22 PM2021-10-20T15:22:51+5:302021-10-20T16:32:59+5:30
सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतात. बाजारपेठेतही अशीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर पथकाद्वारे कारवाई केली जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मागील काही महिन्यांत ४१ हजार ७ नागरिकांवर कारवाई करून १ कोटी ८८ लाख ६२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही. परंतु अनेक नागरिक सुरक्षित अंतर पाळत नाही. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतात. बाजारपेठेतही अशीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर पथकाद्वारे कारवाई केली जात आहे.
सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १३ नागरिकांकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत ६, हनुमाननगर झो १, नेहरूनगर २ आणि गांधीबाग झोन अंतर्गत ४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शोधपथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात मास्क न लावणऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे.
उपद्रव शोध पथक दररोज दहा झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करीत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना पथकाद्वारे केल्या जात आहे.