१८८ कुंटणखाने पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:14+5:302021-08-24T04:12:14+5:30
- लवकरच कुंटणखाने सील करण्याची प्रक्रिया लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंगा-जमुना परिसरातील १८८ कुंटणखाने पोलिसांच्या रडारवर आहेत. ...
- लवकरच कुंटणखाने सील करण्याची प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगा-जमुना परिसरातील १८८ कुंटणखाने पोलिसांच्या रडारवर आहेत. या इमारती (मालमत्ता) नेमक्या कुणाच्या आहेत, ते आम्ही तपासत आहोत, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकारांना सांगितले.
गंगा-जमुनाचा वाद आता चिघळण्याच्या मागावर आहे. समर्थन, विरोध तीव्र झाला असून आरोप प्रत्यारोपही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी पोलीस आयुक्तांशी आज सायंकाळी अनौपचारिक चर्चा केली.
आयुक्त म्हणाले, वारांगना रस्त्यांवर उभ्या राहून ग्राहकांना इशारे करतात. अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करून घेतला जातो. या ठिकाणी मध्यप्रदेश, राजस्थान, ओरिसासह विविध प्रांतातील वारांगनांना दलाल येथे आणतात आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतात. अशा दलालांविरुद्धही कठोर कारवाई केली जात आहे. जमावबंदी व गंगा-जमुनाला सील ठोकल्यानंतर अनेक वारांगना मूळ गावी परतल्या आहेत. मात्र, काही इमारत मालक आणि वारांगना येथेच आहेत. इमारत मालक देहव्यापार बंद करून अन्य व्यवसाय करू शकतात; परंतु त्यांची तयारी नाही. त्यामुळे या
ठिकाणच्या काही इमारत मालकांनी अन्य व्यक्तींना तात्पुरत्या स्वरुपात इमारतीची मालकी दिली आहे. बदल्यात ते मोठी रक्कम वसुलतात.
कायदेशीर प्रक्रियेपासून बचावासाठी गंगा-जमुना परिसरातील अनेक इमारत मालकांनी दुसऱ्यांना इमारतीच्या मालकीचे आममुखत्यारपत्र करून दिले आहे. त्यामुळे कारवाईत अडचण येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी पोलिसांनी १८८ मालमत्तावर नजर केंद्रित केली आहे. पोलिसांकडून मूळ इमारत मालकांचा शोध घेण्यात येईल. इमारतीचे मूळ मालक कोण, कोणाच्या नावे वीज बिल, पाणीपट्टी कर आहे, ते शोधले जाणार असून, त्यानंतर कुंटणखाने सील करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असेही अमितेशकुमार यांनी सांगितले.
--
देहविक्रयाला बंदीच
येथे आता वेश्या व्यवसाय चालू दिला जाणार नाही.
देहव्यापार करणाऱ्या वारांगनांना अन्य व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी वारांगनांनीही पुढे येण्याची गरज असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.
----
नागरिकांना अडचण नाही
पोलिसांनी गंगा-जमुनाला सील केले. मात्र, येथील रहिवाशांना बाहेर किंवा आत जाण्यास कोणतेही बंधन नाही. ग्राहकांसाठी ही बंदी आहे. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती बघून कठडे काढण्यात येतील, असेही अमितेशकुमार म्हणाले.
---
धोटे, पांडे समर्थकांवर गुन्हे दाखल
देहव्यापार समर्थक आणि विरोधकांत रविवारी झालेल्या राड्यानंतर आज पोलिसांचा तेथील बंदोबस्त कडक करण्यात आला. दोन कुंटणखाने सील केली. रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या नेत्या ज्वाला धोटे आणि आभा पांडे यांच्या समर्थकांवर लकडगंज पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
---