नागपूर विभागात आठ महिन्यात शिवशाहीचे १९ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:22 PM2019-11-29T12:22:04+5:302019-11-29T12:28:44+5:30
जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाच्या ताफ्यात प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल झाल्या. शिवशाही बसेसला प्रवाशांनी पसंतीही दर्शविली. परंतु अपघातांच्या बाबतीत मात्र शिवशाही बसेस सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
एसटी महामंडळाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी शिवशाही बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल केल्या. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्याच्या उद्देशाने महामंडळाने उचललेले हे पाऊल यशस्वी ठरले आणि प्रवाशांचाही शिवशाही बसेसला प्रतिसाद मिळाला. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवशाही बसेसवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एसटीच्या नागपूर विभागात एकूण ५६ शिवशाही बसेस आहेत. यात एसटीच्या मालकीच्या २९ आणि खासगी वाहतूकदाराच्या २७ बसेसचा समावेश आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जानेवारी महिन्यात २, फेब्रुवारीत २, मार्च १, एप्रिल ३, मे १, जून २, जुलै २, ऑगस्ट २, सप्टेंबर २ आणि ऑक्टोबर महिन्यात २ अपघात घडले आहेत. शिवशाही बसेसच्या अपघातांची ही आकडेवारी पाहून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवशाहीची सेवा प्रवाशांसाठी चांगली आहे. परंतु अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने ठोस उपाययोजना केल्यास या बसेसकडे प्रवाशांचा ओढा वाढू शकतो, हेही तेवढेच खरे आहे.
खासगी बसेसवर अकुशल चालक
शिवशाही बसेसच्या अपघातांचा आढावा घेतला असता या बसेसवर अकुशल चालक असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. खासगी वाहतूकदाराकडून चालकाची नेमणूक करताना त्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. चालकाला विश्रांतीची योग्य वेळ मिळते की नाही, याची शहानिशा करण्यात येत नाही. याशिवाय शिवशाही बसेसचा वेग अधिक असल्यामुळे या गाड्या नियंत्रित होत नाहीत.
नेहमीच चालकांची चूक नसते
‘रस्त्यावर अनेक वाहने धावतात. अपघात झाल्यानंतर नेहमीच शिवशाही बसेसच्या चालकाची चूक असते असे नाही. अनेकदा दुसरी वाहने शिवशाही बसेसवर येऊन आदळतात. खराब रस्तेही याला कारणीभूत आहेत. त्यामुळे चालकांवर दोष देणे चुकीचे आहे.’
-संजय रामटेके, प्रभारी विभागीय नियंत्रक, नागपूर विभाग