कोळसा वाहतुकीच्या नावावर वाहतूकदाराची १.९० कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:09 AM2019-07-18T00:09:00+5:302019-07-18T00:11:23+5:30
कोळशाच्या वाहतुकीत ३६० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याची बतावणी करून एका वाहतूकदाराची १.९० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळशाच्या वाहतुकीत ३६० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याची बतावणी करून एका वाहतूकदाराची १.९० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अंबाझरी पोलिसांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा नोंदविला आहे. वेकोलि अधिकारी विवेककुमार विजय शुक्ला (४४) सीएमपीडीए कॉलनी, जरीपटका, अरुण थनकपन नायर (५१) मेघसागर अपार्टमेंट, हनुमाननगर आणि हरीश कंचन जैवार (४४) न्यू कॉलनी, अशी आरोपींची नावे आहेत.
हिलटॉप निवासी यशवंत इंगळे वाहतूकदार आहेत. त्यांनी आरोपींना ओळखले आहे. आरोपींनी इंगळे यांना झारखंड येथे कोळशाच्या वाहतुकीचे काम देण्याचे आश्वासन दिले आणि २६ डिसेंबर २०१६ ला करार केला. त्यांना दोन कोटींची गुंतवणूक केल्यावर १० टक्के ‘स्लिपिंग पार्टनरशिप’ देण्याचे आश्वासन दिले. या व्यवसायात सर्वांना ३६० कोटींचा फायदा होईल, असे आरोपींनी सांगितले होते. इंगळेंना हरीश जैवार यांच्या यांगड अॅण्ड सन्स सर्व्हिस एन्टरप्राईजेसशी करार करण्यास सांगितले. त्यानुसार इंगळे यांनी करारसुद्धा केला.
इंगळे यांच्याकडे कथित व्यवसायात गुंतवणुकीसाठी पैसे नव्हते. त्यांनी आरोपींनी सांगितल्यानुसार पुसद अर्बन को-ऑपरेटिव्हच्या गांधीबाग शाखेतून चार कोटींचे कर्ज घेतले. त्यापैकी एक कोटी ९० लाख रुपये हरीश जैवार या आरोपीच्या यांगड अॅण्ड सन्स सर्व्हिस एन्टरप्राईजेसच्या खात्यात जमा केले. त्यानंतर इंगळे कोळसा वाहतुकीचे काम मिळण्याची वाट पाहत होते. यासंदर्भात त्यांनी आरोपींकडे अनेकदा विचारपूस केली. पण आरोपी उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागले. अखेर इंगळे यांनी घटनेची तक्रार अंबाझरी ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करीत चौकशी सुरू केली आहे.