मेडिकलचे १९ गेट बंद
By admin | Published: September 1, 2015 03:31 AM2015-09-01T03:31:28+5:302015-09-01T03:31:28+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेसह सुरक्षेला प्राधान्य देत २३ पैकी १९ प्रवेशद्वार बंद
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेसह सुरक्षेला प्राधान्य देत २३ पैकी १९ प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित चार प्रवेशद्वारावर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कसून तपासणी करून खर्रा, तंबाखू फेकल्याशिवाय आत प्रवेश देऊ नका, असा आदेशच सोमवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी काढला.
मेडिकलमध्ये कोणीही उठसूट येतो. काम नसताना रुग्णालयाच्या आवारात फिरतो. यामुळे भुरट्या चोऱ्या, रुग्ण पळविणाऱ्या दलालांची संख्या वाढल्याच्या तक्रारी आहेत. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी सोमवारी रुग्णालयाचा राऊंड घेतला असता त्यांना ही बाब लक्षात आली. यावर अंकुश ठेवण्यासाठी मेडिकलमध्ये प्रवेश करणाऱ्या दरवाज्यांना टाळे ठोकण्याचे आदेश दिले. त्यांनी सांगितले, रुग्णहिताला प्राधान्य देऊन मुख्य बाह्यरुग्ण विभाग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, लहान मुलांचा वॉर्ड आणि अधीक्षक कार्यालय या चार प्रवेशद्वारातून आता प्रवेश करता येतो. (प्रतिनिधी)
उर्वरित सगळे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. याशिवाय ज्या वॉर्डांमध्ये काळजी घेणे गरजेचे असते तिथेदेखील पासेस व्यवस्था सुरू केली आहे. पास नसल्याशिवाय नातेवाईकाला आत प्रवेश दिला जाणार नाही.