नागपुरातील १९ हॉटेल्स, रेस्टारंट असुरक्षित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:26 PM2018-01-17T22:26:22+5:302018-01-17T22:27:47+5:30
मुंबई येथील आगीच्या घटनेची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली असता यात १९ हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाने या प्रतिष्ठानांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात महावितरण व जलप्रदाय विभागाला पत्र दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई येथील आगीच्या घटनेची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली असता यात १९ हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाने या प्रतिष्ठानांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात महावितरण व जलप्रदाय विभागाला पत्र दिले आहे.
गंजीपेठ अग्निशमन केंद्राने १३ हॉटेल्स असुरक्षित असल्याचे घोषित केले आहे. सुगतनगर व कॉटन मार्के ट केंद्रातर्फे प्रत्येकी दोन रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे. सिव्हिल लाईन व कळमना अग्निशमन केंद्रातर्फे प्रत्येकी एका हॉटेलवर कारवाई करण्यात आली. नरेंद्रनगर, लकडगंज, सक्करदरा अग्निशमन केंद्राच्या तपासणीत कोणतेही हॉटेल असुरिक्षत असल्याचे निदर्शनास आले नाही. गांधीबाग येथील अकोला अर्बन सहकारी बँक परिसरात अग्निशमन विभागाच्या मानकाचे पालन करण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र आग नियंत्रण व सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत संबंधित इमारतींना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये नियमानुसार मोकळी जागा सोडण्यात आलेली नाही. आपात्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग व आग नियंत्रणात आणणारी साधने नसल्याचे निदर्शनास आले. बहुसंख्य इमारतींचे बांधकाम राष्ट्रीय इमारत बांधकाम अधिनियमानुसार करण्यात आलेले नाही.
नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली. निकष पूर्ण न करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित इमारतीत निर्धारित कालावधीत आवश्यक उपाययोजना न केल्यास अशा इमारतींंना सील करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
मेयो रुग्णालयाला नोटीस
अग्निशमन विभागाने इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नियम ६ नुसार उपाययोजना न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. उपाययोजना नसल्याने वेळप्रसंगी येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या नावाने नोटीस बजावण्यात आली आहे तसेच अन्य २९ मालमत्ताधारकांना अग्निशमन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.