नागपुरातील हसनबागेत २९ लाख रुपयाची वीजचोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:25 AM2019-07-24T00:25:32+5:302019-07-24T00:27:14+5:30
वीज वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलने मंगळवारी हसनबाग येथे पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करीत २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल २८.९० लाख रुपयाची वीजचोरी केली असल्याचे उघडकीस आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलने मंगळवारी हसनबाग येथे पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करीत २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल २८.९० लाख रुपयाची वीजचोरी केली असल्याचे उघडकीस आणले. विशेष म्हणजे, एसएनडीएलची ही कारवाई सुरू असताना परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पथकाच्या कारवाईचा तीव्र विरोध करण्यात आला. एका ठिकाणी एसएनडीएलच्या महिला कर्मचाऱ्याला ढकलण्यात आल्याची बाबही पुढे आली आहे. मात्र, पोलीस कर्मचारी मदतीला असल्याने या भागात कारवाई करणे शक्य झाले.
नंदनवन पोलीस ठाण्याच्या सहकार्याने मंगळवारी एसएनडीएलच्या कारवाईस सुरुवात झाली. कारवाईमध्ये एपीआय मिलिंद तायडे आणि पीएसआय वाघ यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. कारवाईदरम्यान एसएनडीएलच्या पथकाने ८३ ठिकाणी चौकशी केली. यात २९ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. या २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल ८.९० लाख युनिट्सची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचे २८.९० लाख रुपये इतके इस्टिमेट बनविण्यात आले. कारवाईदरम्यान अनेक घरांमध्ये जुने इलेक्ट्रो मेकॅनिकल मीटर असल्याचे दिसून आले. या मीटर्सला नव्या डिजिटल मीटरमध्ये बदलविण्यात आले. दरम्यान, वीजचोरी करणाऱ्यांकडून एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, पोलिसांच्या मदतीने समस्या सोडविण्यात आली. एसएनडीएलने दिलेल्या माहितीनुसार, लिंक कापून चोरी करण्याची १३ प्रकरणे पुढे आली आहेत. तसेच १० ठिकाणी न्यूट्रल कापून चोरी होत असल्याचे स्पष्ट झाले. एका घरी मीटरमध्येच गडबड करण्यात आल्याचेही दिसून आले.
पाच ट्रान्सफॉर्मर्समधून ६५ टक्के वीजचोरी
हसनबाग परिसरात पाच ट्रान्सफॉर्मर्सच्या माध्यमातून विजेचा पुरवठा केला जातो. या पाचही ट्रान्सफॉर्मर्समधून ५८ ते ६५ टक्के वीजचोरी होत असल्याचे डीटीसी ऑडिटमधून स्पष्ट झाले. ही बाब हेरूनच या भागात व्यापक अभियान चालविण्यात येत आहे. शहरातील ज्या भागात अशा घटना उघडकीस येत आहेत, अशा भागामध्येही अशाच प्रकारचे अभियान राबविण्यात येणार असल्याचे एसएनडीएलने स्पष्ट केले आहे.