माय गॉड... रेल्वेत बेशिस्त प्रवाशांचा कळस; विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांवर बडगा!
By नरेश डोंगरे | Published: October 15, 2024 08:49 PM2024-10-15T20:49:38+5:302024-10-15T20:53:38+5:30
सहा महिन्यात आढळले १९ लाखांवर प्रवासी.
नरेश डोंगरे - नागपूर , लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार कारवाई करूनही फुकटे तसेच बेशिस्त प्रवासी जुमानायला तयार नसल्याचे एकदा उघड झाले आहे. रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील विविध मार्गावर राबविलेल्या तिकिट तपासणी मोहिमेत तब्बल १९ लाखांपेक्षाही जास्त फुकटे तसेच बेशिस्त प्रवासी आढळले. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यात ही तिकिट तपासणी मोहिम राबविण्यात आली होती.
मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये मार्च, एप्रिल महिन्यापासून अचानक अनपेक्षित गर्दी वाढली. एसी कोचचे तिकिट नसतानादेखिल अनेक प्रवासी एसी कोचमध्ये शिरून प्रवास करीत असल्याच्याही तक्रार वाढल्या. त्यामुळे विविध गाड्यांमध्ये रेल्वे स्टाफने १ एप्रिल पासून आकस्मिक तिकिट तपासणी मोहिम राबविणे सुरू केले. विविध गाड्या आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे तिकिट तपासले जाऊ लागले. त्यात रेल्वेचे अधिकारीही चक्रावले. अनेक प्रवासी विनातिकिट प्रवासी करीत होते आणि काही प्रवासी तर जनरलचे तिकिट असताना चक्क एसी कोचमध्ये शिरून प्रवास करीत असल्याचे उघड झाले. परिणामी रेल्वे प्रशासनाने १ एप्रिल पासून सुरू केलेली ही तिकिट तपासणी मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत राबविली. त्यात रेल्वे स्टाफला १९ लाख, ९ हजार फुकटे आणि बेशिस्त प्रवासी हाती लागले. त्यांच्यामुळेच रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढल्याचे आणि विनाकारण दुसऱ्या प्रवाशांना त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले.
---------------------------
दंडाची रक्कम १११.६२ कोटी
उपरोक्त ६ महिन्यांच्या तिकिट तपासणीत आढळलेल्या विनातिकिट आणि बेशिस्त प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने १११ कोटी, ६२ लाख रुपयांचा दंड वसूल केला.
१३ हजार गाड्यातून अडीच लाख बेशिस्तांची हकालपट्टी
गाड्यांमधील वाढलेल्या गर्दीची कारणे तपासतानाच गर्दी नियंत्रित करण्यासाठी १४ जून ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत रेल्वे प्रशासनाने वेगळीच तपासणी हाती घेतली. त्यात १२,९३० गाड्यांमध्ये रिझर्वेशन नसताना देखिल २ लाख, ५४ हजार, ७९५ प्रवासी चढल्याचे आढळले. त्यांना या कोचमधून बाहेर काढण्यात आले. त्यासाठी रेल्वेने क्विक रिस्पॉन्स टीमची मदत घेतली.