पदस्थापनेपासून दूर ठेवत राज्यातील १९ एसपी, डीसीपींना सरकारचा जोरदार झटका

By नरेश डोंगरे | Published: October 20, 2022 10:31 PM2022-10-20T22:31:09+5:302022-10-20T22:31:20+5:30

चार महिन्यांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील २५ पोलीस अधीक्षक (एसपी) तसेच उपायुक्तांच्या (डीसीपी) विविध ठिकाणी बदल्या करून अखेर राज्य सरकारने या पोलीस अधिकाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले.

19 SPs, DCPs of the state are being kept away from the post by the government | पदस्थापनेपासून दूर ठेवत राज्यातील १९ एसपी, डीसीपींना सरकारचा जोरदार झटका

पदस्थापनेपासून दूर ठेवत राज्यातील १९ एसपी, डीसीपींना सरकारचा जोरदार झटका

Next

नागपूर :

चार महिन्यांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील २५ पोलीस अधीक्षक (एसपी) तसेच उपायुक्तांच्या (डीसीपी) विविध ठिकाणी बदल्या करून अखेर राज्य सरकारने या पोलीस अधिकाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले. दुसरीकडे तब्बल १९ एसपी/ डीसीपींना बदलीच्या बदल्यात कुठलीही पोस्ट न देता हँग करून त्यांच्यासह त्यांच्या गॉडफादर्सनाही दिवाळीच्या तोंडावर जोरदार झटका दिला. सरकारच्या या बदली प्रक्रियेने राज्य पोलीस दलात उलटसुलट चर्चेसह 'कही खुषी कही गम' ची स्थिती निर्माण झाली आहे.

दोन-चार जणांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक ठिकाणी एसपी / डीसीपी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सेवाकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे येथून बदलून जाताना दुसऱ्या ठिकाणी क्रिम पोस्ट मिळावी म्हणून अनेकांनी मे २०२२ पासून जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यासाठी 'आवश्यक त्या सर्व उपाययोजना'ही त्यांनी केल्या होत्या. अनेकांनी हे करतानाच आपल्या गॉडफादर्सनाही कामी लावले होते. ठरल्यानुसार, मुंबईत त्यानुसार लिस्टही तयार झाली. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर केंद्राच्या दोन-तीनही एजंसीज नजर ठेवून असल्याने प्रत्येकवेळी या बदल्यांची तारिख पुढे ढकलण्यात आली. हा अधिकारी जाणार, तो येणार अशी जोरदार चर्चा असतानाच अखेर राज्यातील लोकशाही आघाडीचे सरकार गेले अन् शिंदे - फडणवीसांचे सरकार राज्यात आले. त्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी नव्याने फिल्डिंग लावली. मात्र, एसपी, डीसीपी आणि त्यावरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुहूर्त काही केल्या निघत नव्हता. परिणामी राज्य पोलीस दलात मोठी धुसफूस सुरू झाली होती. अखेर शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी, २० ऑक्टोबरला एसपी, डीसीपींच्या बदल्यांचा मुहूर्त साधला. एकसाथ २५ नव्या - जुन्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गुरुवारी रात्री आदेश काढण्यात आले. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना दिवाळीची भेट मिळाल्यासारखा आनंद झाला आहे. मात्र, हे करतानाच सरकारने यापुर्वी एसपी, डीसीपी म्हणून काम करणाऱ्या तब्बल १९ अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश न देता त्यांना 'हँग' करून ठेवले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये विदर्भातील सहा एसपींचाही समावेश आहे.


पहिल्यांदाच जोर का झटका
एवढ्या मोठ्या संख्येतील एसपी, डीसीपींना पदस्थापनेपासून दूर ठेवण्याचा अलिकडच्या काही वर्षांतील हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे या सर्वांना जोरदार झटका बसल्याची जोरदार चर्चा पोलीस दलात आहे. वर्धेचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, यवतमाळचे दिलीप पाटील भुजबळ, चंद्रपूरचे अरविंद साळवे, गडचिरोलीचे अभिनव देशमुख, गोंदियाचे विश्व पानसरे आणि अकोला येथील जी. श्रीधर यांचा हँग झालेल्या पोलीस अधीक्षकांमध्ये समावेश आहे.

नागपूरचा दरारा
नागपुरात एसपी, डीसीपी म्हणून कार्यरत असलेल्या पाच अधिकाऱ्यांना आज बदलीच्या रुपात दिवाळी गिफ्ट मिळाले. यातील एसपी, एसीबी म्हणून कार्यरत असलेले राकेश ओला यांना अहमदनगर, डीसीपी नुरूल हसन यांना वर्धा, एसपी रेल्वे एम. राजकुमार यांना जळगाव, डीसीपी सारंग आवाड यांना बुलडाणा तर डीसीपी बसवराज तेली यांना सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे आजच्या बदलीच्या आदेशातून नागपूरचा दरारा पुन्हा एकदा राज्य पोलीस दलाने अनुभवला आहे.

Web Title: 19 SPs, DCPs of the state are being kept away from the post by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस