मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 07:04 PM2022-07-02T19:04:36+5:302022-07-02T19:05:05+5:30

Nagpur News देशाला जोडणाऱ्यांना बाजुला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपले दुर्दैव असल्याची खंत माजी खासदार आणि ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली.

19 th Samarasata samelan in Nagpur | मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

googlenewsNext

नागपूर : तळागाळातल्या माणसांचा आवाज झालेल्यांचा इतिहास सांगण्याऐवजी परकीय आक्रमणांच्या क्रौर्याचा इतिहास आपल्या माथी मारला गेला. देशाला जोडणाऱ्यांना बाजुला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपले दुर्दैव असल्याची खंत माजी खासदार आणि ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली.

समरसता साहित्य परिषदेच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित द्विदिवसीय १९व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्ष व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदपुरे, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, निमंत्रक सुनील वारे, सहनिमंत्रक डॉ. सुनील भडंगे, प्रा. संजय गायकवाड, संमेलनाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे उपस्थित होते. संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी विद्यमान अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. यावेळी तरुण विजय यांच्या हस्ते संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

रंजल्या-गांजल्यांचे अश्रू पुसणे आपली संस्कृती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत शोषितांचा आवाज बुलंद केला. जगण्या-मरण्यातील दुःख, वेदना, संघर्ष हा अण्णा भाऊंच्या साहित्यातला आत्मा आहे. त्यामुळे अण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने समरसतेचे दधिची होत. साहित्य हे समाजाला जोडण्याचे काम करते. द्वेषाच्या विषाची बीजे पेरून कोणताही देश उभा राहू शकत नाही. वंचितांच्या वेदनांचा हुंकार झालेले साहित्य हे समाजाला भानावर आणत असते. त्यामुळे वेदनेतून जन्मलेले साहित्य हे उच्च वर्णाहून किंचितही कमी लेखता येत नाही, असेही तरुण विजय यावेळी म्हणाले. प्रास्ताविक डॉ. प्रसन्न पाटील यांनी तर सुनील वारे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन विवेक अलोणी आणि शलाका जोशी यांनी केले. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी आभार मानले तर डॉ. जयश्री शास्त्री यांनी पसायदान सादर केले.

ग्रंथदिंडीने वातावरणनिर्मिती

उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यांत एनएसएसच्या विद्यार्थिंनी व महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सुवासिनींनी तरुण विजय, डॉ. अक्षयकुमार काळे व इतर मान्यवरांचे औक्षण केले व त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर रांगोळी प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

प्रतिगामी शक्तीला जनशक्ती उद्ध्वस्त करू शकते - अक्षयकुमार काळे

प्रतिगामी शक्ती कितीही मजबूत असल्या तरी त्यांना जनशक्तीच्या माध्यमातून पूर्णपणे उद्ध्वस्त करता येते, याची शिकवण अण्णा भाऊंचे साहित्य देते. त्यांचे साहित्य धगधगत्या ज्वालामुखी असून ते ज्वलंत मनोवृत्तीचे आहे, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

............

Web Title: 19 th Samarasata samelan in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.