१९०० किलो आंबे जप्त
By admin | Published: May 6, 2014 10:07 PM2014-05-06T22:07:25+5:302014-05-07T02:47:23+5:30
कार्बाईड या रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणार्या संत्रा मार्केट येथील दोन व्यापार्यांवर अन्न प्रशासन विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता धाड टाकून १९०० किलो आंबे जप्त केले.
अन्न प्रशासन विभागाची कारवाई : व्यापार्यांमध्ये खळबळ
नागपूर : कार्बाईड या रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणार्या संत्रा मार्केट येथील दोन व्यापार्यांवर अन्न प्रशासन विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता धाड टाकून १९०० किलो आंबे जप्त केले. या कारवाईने व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जप्त केलेले आंबे खाण्यास अयोग्य असल्याने तात्काळ भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये नष्ट केले. आंब्याची बाजारभाव किंमत २५ हजार रुपये आहे. संजय बागडे या व्यापार्याकडून १५०० किलो आणि अंबिका प्रसाद शाहू यांच्या पेढीवर धाड टाकून ४०० किलो आंबे जप्त केले. कार्बाईडच्या पुड्या ठेवून आंबे पिकवित असल्याचे दोन्ही फर्मवर आढळून आले. दोघांकडून एक किलो कार्बाईड जप्त केले. गैरकायदेशीर मार्गाचा वापर करून फळे पिकविणार्या व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्तांनी स्पष्ट केले.
याआधीही विभागाने शनिवारी कळमना येथील सागीर सय्यद बशीर अली या व्यापार्याच्या फर्मवर धाड टाकून कार्बाईडने पिकविण्यात येणारे १५ हजार रुपये किमतीचे ६०० किलो आंबे जप्त केले होते. विभागाने आतापर्यंत २५०० किलो आंबे जप्त करून नष्ट केले आहेत. ही कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा सहआयुक्तांनी दिला आहे.
ही कारवाई अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख आणि सहायक आयुक्त न.रं. वाकोडे व एम.सी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.प्र. देशपांडे, बी.जी. नंदनवार आणि व्ही.पी. धवड यांनी केले.