एटीएम हॅक करून १.९३ लाख उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:16+5:302021-09-04T04:13:16+5:30
नागपूर : एटीएम हॅक करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून १.९३ लाख रुपये उडविल्याची घटना एमआयडीसी ठाण्यांतर्गत वानाडोंगरीत घडली. ...
नागपूर : एटीएम हॅक करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून १.९३ लाख रुपये उडविल्याची घटना एमआयडीसी ठाण्यांतर्गत वानाडोंगरीत घडली. वानाडोंगरीशिवाय सक्करदरा तसेच कामठीतही एटीएम हॅक केल्याची माहिती आहे. अडीच महिन्यांत दुसऱ्यांदा हॅकर्सची टोळी सक्रिय झाल्यामुळे पोलिसातही खळबळ उडाली आहे.
वानाडोंगरीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. ३० ऑगस्टला तीन युवक तेथे आले. त्यांनी एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले. मशीनमध्ये रकमेची नोंद केल्यानंतर ट्रेमध्ये नोटा येण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर आरोपी ट्रेचे शटर पकडत होते. त्यामुळे मशीनमध्ये एरर येते. एरर आल्यामुळे संबंधित एटीएमधारकाच्या खात्यात व्यवहाराची नोंद होत नाही. सकाळी ७.५५ ते ८.४८ दरम्यान ५३ मिनिटांत आरोपींनी १७ ट्रान्झॅक्शन करून १.९३ लाख रुपये उडविले. एटीएममध्ये जमा आणि काढलेल्या रकमेची माहिती समजल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याच पद्धतीने जून महिन्यात बजाजनगर, लकडगंज, गणेशपेठ तसेच प्रतापनगर ठाण्याच्या परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम हॅक करून रक्कम उडविण्यात आली होती. झोन एकचे उपायुक्त नुरुल हसन यांच्या नेतृत्वात हरयाणाच्या मेवात येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. हे आरोपी तुरुंगात आहेत. वानाडोंगरीत घडलेल्या घटनेमुळे नवी आंतरराज्यीय टोळी शहरात सक्रिय झाल्याचे समजते. एमआयडीसी पोलीस एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेण्याच्या कामी लागले आहेत. मास्क घातलेले असल्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नाहीत. परिसरातील सीसीटीव्हीवरून त्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या मार्गाचा शोध घेण्यात येत आहे.
...........