१९६ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:14+5:302021-07-08T04:08:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना नियंत्रणासाठी चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात आला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली; ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना नियंत्रणासाठी चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात आला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली; पण संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेता लसीकरणावर भर दिला जात आहे. नागपूर शहरातील ४५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांत शहरातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी १९६ कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापौरपदाची सूत्रे स्वीकारण्याला सहा महिन्याचा कालावधी झाला. या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांत राबविण्यात आलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प व कार्य याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके, संदीप जाधव, महिला व बाल कल्याण सभापती दिव्या धुरडे आदी उपस्थित होते.
यावर्षी स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने देशप्रेमाची जाज्वल्य भावना नागरिकांच्या मनात जागविण्याचा दृष्टीने ७५ चौकांचे सौंदर्यीकरण, स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांना वंदन, ७५ वंदेमातरम् हेल्थ पोस्ट, ७५ ऑक्सिजन झोनची निर्मिती, मनपा शाळांतील ७५ सुपर विद्यार्थ्यांची निवड, शहरातील विद्यार्थ्यांना सैनिकपूर्व प्रशिक्षण अशा उपक्रमांना सुरुवात केली आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता लोकसहभातून अनेक प्रकल्प राबविले जात आहे. काही प्रकल्पांना सुरुवात झाली तर काहींची निविदाप्रक्रिया सुरू असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
...
सात हजार बेड उपलब्ध केले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरात रुग्णांना बेड मिळत नव्हते. यासाठी मनपास्तरावर नियोजन करण्यात आले. शासकीय व खासगी रुग्णालयांत सात हजार बेड उपलब्ध करण्यात आले. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, के.टी. नगर, पाचपावली, आयसोलेशन रुग्णालये सुसज्ज करण्यात आली. मनपात केंद्रीय कक्ष निर्माण करण्यात आला. गरजूंना बेड उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली.
...
असे आहेत विविध प्रकल्प
-ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे
-७५ चौकांचे सौंदर्यीकरण
-स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना अभिवादन
-वंदेमातरम् उद्यानाची निर्मिती
-७५ वंदेमातरम् हेल्थ पोस्ट
-७५ ऑक्सिजन झोन
-एक हजार ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी
-पंंडित दीनदयाळ अंत्योदय योजना
-पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा
-विद्यार्थ्यांना सैनिकपूर्व प्रशिक्षण
-गणिती उद्यानाची निर्मिती
-महापौर दृष्टी सुधार योजना
-महापौर नेत्रज्योती योजना
-महापौर जीवनावश्यक औषधी अधिकोष
-महापौर वैद्यकीय साधनसामग्री अधिकोष
-माता दुग्ध अधिकोष
-विद्यार्थ्यांकडून पुतळ्याचे व्यवस्थापन व अग्निशमन प्रशिक्षण
-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई-लायब्ररी