जिल्ह्यातील १९९० शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:07 AM2021-04-03T04:07:04+5:302021-04-03T04:07:04+5:30

अन्न शिजविण्यासाठी शाळांना मिळणार गॅस कनेक्शन नागपूर : जिल्हा परिषद, महापालिका, अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्यासाठी शासन गॅस जोडण्या ...

1990 schools in the district will be freed from stove smoke | जिल्ह्यातील १९९० शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती

जिल्ह्यातील १९९० शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती

Next

अन्न शिजविण्यासाठी शाळांना मिळणार गॅस कनेक्शन

नागपूर : जिल्हा परिषद, महापालिका, अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्यासाठी शासन गॅस जोडण्या देणार आहे. दोन सिलिंडर व एक शेगडी यासाठीचे अनुदान शाळांना मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील गॅस जोडण्या नसलेल्या शाळांची माहिती जिल्हा परिषदेने शाळांना पाठविली होती. त्यात ग्रामीण भागातील १७२० व शहरातील २७० शाळांमध्ये गॅस जोडणी नसल्याचे आढळले आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. नागपूर जिल्ह्यात काही शाळात पोषण आहार बनविण्याचे काम बचत गटांना दिले आहे. तर शहरात व नगर परिषदेच्या काही भागातील शाळेत सेंटर किचनच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. शासन पोषण आहाराचे अनुदान पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन गटात प्रत्येक विद्यार्थ्यानिहाय देते. त्यातून भाजीपाला, अन्नधान्य व इंधनाचा खर्च केला जातो. काही शाळांमध्ये इंधन म्हणून अजूनही लाकूडफाट्याचा वापर केला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यांना गॅस जोडण्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे या शाळा आता धूरमुक्त होणार आहेत. लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून शाळेत पोषण आहार शिजविणे बंद आहे. पुढे शाळा सुरू झाल्यानंतर गॅसवर आहार शिजणार आहे. शासन त्याचा खर्च शाळांना देणार आहे.

- दृष्टिक्षेपात

- जिल्ह्यातील एकूण शाळा - ५,८८५

- गॅस जोडणी नसलेल्या शाळा - १,९९०

गॅस जोडण्या नसलेल्या शाळांची माहिती शासनाला पाठविण्यात आली होती. शासनाने लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांपर्यंत कडधान्याच्या माध्यमातून पोषण आहार पोहोचविला. आता शाळांना गॅस जोडणी देऊन पर्यावरण संरक्षणाचे कामच होणार आहे.

गौतम गेडाम, अधीक्षक, शालेय पोषण आहार

Web Title: 1990 schools in the district will be freed from stove smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.