पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले अन् सोन्याची चेन हिसकावून पळाले; सीसीटीव्हीमुळे सापडले ‘चेनस्नॅचर्स’
By योगेश पांडे | Published: September 21, 2022 05:22 PM2022-09-21T17:22:12+5:302022-09-21T17:23:50+5:30
इतवारीतील परवारपुरा जैन मंदिराजवळ सोन्याची चेन लांबविणारे चोर सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
नागपूर : तीन दिवसांअगोदर इतवारीतील परवारपुरा जैन मंदिराजवळ सोन्याची चेन लांबविणारे चोर सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे पोलिसांच्या हाती लागले आहेत. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणात दोन चेनस्नॅचर्सला अटक केली आहे. सचिन टाकलीकर (२८, टिमकी) व रुपेश पांडे (२८, शांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
१८ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हर्षा दीपक जैन या इतवारीतील दिगंबर जैन मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पत्ता विचारण्याचा कांगावा करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. त्यांच्या तक्रारीनंतर लकडगंज पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांना मोटारसायकलचा क्रमांक सापडला. त्यावरून मालकाचे नाव व पत्ता माहिती करत पोलीस सचिनच्या घरी पोहोचले. सचिनने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या पडताच त्याने रुपेशसोबत चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली.