संत्र्यांचे संशोधन आणि प्रजातींच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 09:58 PM2019-01-12T21:58:37+5:302019-01-12T21:59:51+5:30
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि उत्पादन वाढविण्यासाठी लोकमततर्फे वर्ष-२०१८ मध्ये आयोजित जागतिक संत्रा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार दोन कोटींचा निधी कृषी विभागाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविला आहे. या निधीचा उपयोग संत्र्यांचे संशोधन, नवीन प्रजाती आणि कलमांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि उत्पादन वाढविण्यासाठी लोकमततर्फे वर्ष-२०१८ मध्ये आयोजित जागतिक संत्रा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार दोन कोटींचा निधी कृषी विभागाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविला आहे. या निधीचा उपयोग संत्र्यांचे संशोधन, नवीन प्रजाती आणि कलमांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.
विदर्भातील संत्रा उत्पादकांची प्रगती कशी होईल आणि त्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने लोकमतच्या वतीने वर्ष-२०१८ मध्ये संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लोकमतच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या प्रगतीसाठी दोन कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्याकरिता लोकमतने पाठपुरावा केला होता. निधी न मिळाल्याने एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी तात्काळ दोन कोटींचा निधी मंजूर करण्याचे आदेश राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना दिले होते. त्यानुसार हा निधी विद्यापीठाला पाठविण्यात आल्याचा दुजोरा डवले यांनी लोकमतशी बोलताना दिला.
महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात येत आहेत. वैदर्भीय संत्रा उत्पादकांच्या समस्या आणि त्यांना काय हवे, याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण संत्र्यांचे उत्पादन कसे वाढेल, सीडलेस प्रजातींचा विकास आणि समस्या कशा सुटेल, यावर महोत्सवात कृषी तज्ज्ञांतर्फे चर्चा करण्यात येते. नागपुरी संत्री जगात प्रसिद्ध आहे. महोत्सवामुळे गेल्यावर्षीपर्यंत संत्रा उत्पादनात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा क्रमांक तिसऱ्या स्थानावर आला आहे.
निधीचा उपयोग संत्र्याच्या विकासासाठी
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या दोन कोटी निधीचा उपयोग संत्र्यावर संशोधन आणि प्रजातीच्या विकासासाठी निश्चितच होईल.
व्ही.एस. भाले, कुलगुरू,
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला.
जागतिक संत्रा महोत्सव १८ ते २१ जानेवारीपर्यंत
यावर्षी लोकमततर्फे जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. शिवाय सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात वेगवेगळे उपक्रम आणि ग्राहक प्रदर्शन होणार आहे.