दोन लाखांवर महिलांनी केला एसटीत 'हाफ तिकीट' प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 09:59 PM2023-03-24T21:59:45+5:302023-03-24T22:13:59+5:30

Nagpur News अवघ्या एका आठवड्यात २ लाख, ७ हजार महिलांनी प्रवास करून नागपूर विभागाच्या एसटीच्या तिजोरीत ५४ लाखांचे घसघशीत उत्पन्न जमा केले आहे.

2 lakh Women traveled 'half ticket' in ST | दोन लाखांवर महिलांनी केला एसटीत 'हाफ तिकीट' प्रवास

दोन लाखांवर महिलांनी केला एसटीत 'हाफ तिकीट' प्रवास

googlenewsNext

 

नागपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'महिला सन्मान योजने'ची अंमलबजावणी सुरू होताच नागपूर विभागातील महिलांनी एसटी प्रवासाचा लाभ घेणे सुरू केले आहे. अवघ्या एका आठवड्यात २ लाख, ७ हजार महिलांनी प्रवास करून नागपूर विभागाच्या एसटीच्या तिजोरीत ५४ लाखांचे घसघशीत उत्पन्न जमा केले आहे.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांना प्रवास करताना ५० टक्के प्रवास भाड्यात सुट देण्याची घोषणा केली होती. एसटी महामंडळाला या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले होते.

२ लाख, ७ हजार महिलांनी घेतला लाभ

१७ मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी एसटीत सुरू झाली. फक्त ५० टक्केच भाडे, अर्थात तिकिटाचे अर्धेच पैसेच द्यावे लागत असल्याने पहिल्या दिवशीपासूनच एसटीकडे महिलांनी धाव घेतली. त्यामुळे १७ ते २३ या एका आठवड्यात नागपूर विभागाच्या एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये तब्बल २ लाख, ७ हजार महिलांनी प्रवास केला.

रोज २५ ते ३० हजार महिलांचा प्रवास

कोणतेही ओळखपत्र नको अन् काही कागदपत्रेही दाखवावी लागण्याची झंजट नाही. सरळ एसटी बसमध्ये बसा आणि योजनेचा लाभ घ्या, असा सरळ साधा हिशेब असल्याने अनेक मार्गावरच्या एसटी बसेस महिला मुलींनी फुलल्याचे दिसून येते. नागपूर जिल्ह्यात रोज २५ ते ३० हजार महिला या योजनेचा लाभ घेत एसटीतून प्रवास करतात.

आता मीच जाते तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी

तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन किराणा, धान्य तसेच काही आवश्यक सामान घ्यायचे असेल तर घरातील ज्येष्ठ नागरिकांना आठवडी बाजारात पाठवावे लागत होते. त्यांना सामान उचलण्याचा त्रास व्हायचा. त्यामुळे एसटी बस थांब्यावर त्यांच्या येण्याची वाट बघावी लागत होते; मात्र आता एसटी बसमध्ये प्रवासाचे अर्धेच भाडे द्यावे लागत असल्याने मी स्वत:च तालुका, जिल्हास्थळी बाजारहाट करण्यासाठी, सामान घेण्यासाठी जाते, अशी प्रतिक्रिया कमला राऊत यांनी दिली. तर, या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिला, मुलींना खूप दिलासा मिळाला आहे. सरकारने सुरू केलेली ही योजना खूपच चांगली आहे, असे मत शांताबाई वटाणे या प्रवासी महिलेने व्यक्त केले.

 

शासनाच्या या निर्णयाचा लाभ एकीकडे महिला, मुलींना होत आहे. दुसरीकडे एसटीलाही त्याचा मोठा लाभ मिळत आहे. कारण एसटीत प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण अचानक वाढले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत उत्पन्नाच्या रुपाने भर पडत आहे.

-श्रीकांत गभने

उपमहाव्यवस्थापक, एसटी, नागपूर विभाग.

-----

Web Title: 2 lakh Women traveled 'half ticket' in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.