२ रु. रोजंदारी मजूर ते २००० कोटींची मालक ; कल्पना सरोज यांचा थक्क करणारा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:34 AM2019-01-06T01:34:30+5:302019-01-06T01:35:35+5:30
आत्महत्या करण्याचा विचार मनात आला तर एकदा मुंबईतील उद्योजिका कल्पना सरोज यांना भेटा, असा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी असे का म्हटले असावे, याचा उलगडा शनिवारी जागतिक मराठी संमेलनाच्या मंचावर स्वत: पद्मश्री कल्पना सरोज यांच्याकडूनच झाला. अत्यंत खडतर प्रवास करताना केवळ २ रुपये रोजीने शिवणकाम करणारी ही महिला २००० कोटींच्या व्यवसायाची मालकीण होते, हा प्रवास खरं तर रोमांचक आणि अंतर्मुख करणाराही आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आत्महत्या करण्याचा विचार मनात आला तर एकदा मुंबईतील उद्योजिका कल्पना सरोज यांना भेटा, असा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी असे का म्हटले असावे, याचा उलगडा शनिवारी जागतिक मराठी संमेलनाच्या मंचावर स्वत: पद्मश्री कल्पना सरोज यांच्याकडूनच झाला. अत्यंत खडतर प्रवास करताना केवळ २ रुपये रोजीने शिवणकाम करणारी ही महिला २००० कोटींच्या व्यवसायाची मालकीण होते, हा प्रवास खरं तर रोमांचक आणि अंतर्मुख करणाराही आहे.
वनामतीच्या सभागृहात १६ व्या जागतिक मराठी संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेखण व सचिन ईटकर यांनी कल्पना सरोज यांची मुलाखत घेतली. अकोल्याजवळच्या रेपाडखेडा या गावातील कल्पना. पोलीस गर्ल असलेल्या कल्पना यांच्या जीवनातील संघर्षाचा प्रवास वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून सुरू झाला. जेमतेम सातव्या वर्गात असताना कल्पना यांचे लग्न झाले. तिला शिकायचे होते, पण ते मिळाले नाही. लग्नानंतर सुखाचे जीवन मिळेल, ही आशाही थोड्याच महिन्यात मावळली. मुंबईच्या झोपडपट्टीत राहताना सासरच्यांकडून अतोनात छळ सहन करावा लागला. त्यामुळे एक दिवस वडिलांनी तिला परत आणले. ८० च्या दशकातील तो काळ. लोकांचे बोलणे असह्य करणारे. एकेदिवशी आत्महत्या करण्याचा प्रयत्नच तिने केला. पण यावेळीही सहानुभूतीऐवजी लोकांचे संशयकारक बोलणेच तिला ऐकावे लागले. मात्र या एका प्रसंगाने तिला कणखर बनविले. दहावीपर्यंत शिक्षण करून पोलीस, सैन्य किंवा नर्सिंग अशा ठिकाणी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला, पण अपयश हाती आले. त्यामुळे निर्धार करून तिने अकोला सोडले आणि पुन्हा मुंबई गाठली. मात्र सासरला न जाता दुसऱ्या एका झोपडपट्टीत ओळखीच्यांच्या आधाराने राहू लागली. एक दिवस त्यांच्यासोबत राहणारी लहान बहीण औषधाविना मरण पावल्याची दु:खद आठवणही त्यांनी नमूद केली.
शिवणकाम शिकले होते. त्याच आधारावर तिने एका कंपनीत २ रुपये रोजीने नोकरी मिळविली. निराशा झटकून वेगाने काम सुरू केले तेव्हा पगाराचे २२५ रुपये तिला मिळाले. पहिल्यांदा १०० रुपयाची नोट पाहिल्याचा उल्लेख त्यांनी केला. हे करताना स्वत:चा शिवणकामाचा व्यवसाय सुरू करून वस्तीतील गरजू महिलांना रोजगार देण्याचा विचार करीत ५० हजार रुपये कर्ज काढले आणि व्यवसाय सुरू केला.
वस्तीतील महिलांचे प्रेम आणि ज्यांच्याकडे त्यांचे कपडे जायचे त्या मोठ्या उद्योजकांचा विश्वासही वाढत होता.
अशातच एक दिवस डबघाईस गेलेल्या कमानी ट्यूब कंपनीच्या ९३ कामगारांनी ही कंपनी टेकओव्हर करण्याची विनंती केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कंपनी कामगारच चालवीत होते. ११६ कोटींचे कर्ज, १४० पेक्षा जास्त न्यायालयीन खटले सुरू असलेली ही कंपनी कशी घ्यायची, हा प्रश्नच होता. पण कंपनीच्या दुरवस्थेमुळे कामगारांची दैनावस्था झाली होती व त्यांच्या कुटुंबाचे हालहाल झालेले त्यांनी पाहिले आणि केवळ कामगारांचा विचार करून त्यांनी कंपनी घेण्याचा निर्धार केला. पुढे राज्याच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांना भेटून कंपनीच्या कर्जाचे व्याज आणि दंड माफ करण्याची विनंती केली. त्यांनीही ती मान्य करीत मूळ कर्जातही सूट देऊ केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढचा एकेक टप्पा गाठत आज कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले आहे. २०१३ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला.त्यांच्या शब्दानुसार स्वत:मधील आत्मविश्वास शोधून प्रामाणिकपणा व १०० टक्के कष्ट घेण्याची तयारी असेल तर कोणतेही शिखर गाठता येते. एक मात्र खरे समाजात जसे वाईट लोक असतात तसे चांगलेही असतात. तुमच्यातील चांगलेपणामुळे ते नक्की जवळ येतात. अशा मदत करणाऱ्या, धावून येणाऱ्या व भक्कमपणे पाठीशी उभे राहिलेल्या लोकांमुळे यश मिळू शकल्याची कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
हत्येचाही झाला प्रयत्न
शिवणकामाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर एका गरजू माणसाच्या विनंतीवरून त्याची जागा विकत घेतली. मात्र ही जागा सिलिंगमध्ये असून वादग्रस्त असल्याचे नंतर कळले. त्यांनी प्रयत्न करून या जागेचा ताबा मिळविला व आपल्या कंपनीसाठी बांधकाम सुरू केले. मात्र स्थानिक गुंडांचा यास विरोध होता. त्यावेळी पाच लाखात त्यांच्या हत्येची सुपारी दिली. मात्र हत्येसाठी पाठविलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कधीतरी मदत केली होती. त्यामुळे त्यानेच सूचना केली, पण धोका असल्याने मुंबई सोडून जाण्याची विनंतीही केली. मात्र माघार न घेता ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची मदत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
युनोमध्ये साजरी केली बाबासाहेबांची जयंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती असताना ती युनोमध्ये साजरी करण्याचा विचार मनात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ती तात्काळ मंजूर केली आणि अमेरिकेच्या टाइम्स चौकापासून युनोपर्यंत मिरवणूक काढून उत्साहात त्यांची जयंती साजरी केल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर घेण्यातही सरोज यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी मोदी यांनी क्षणात मदत जाहीर केल्याचे त्यांनी नमूद केले.