महामार्ग भूसंपादनासाठी २० ते ६०% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर अखेर जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 07:09 AM2022-01-15T07:09:11+5:302022-01-15T07:09:16+5:30
अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक २ दिला जात होता.
- आशिष रॉय
नागपूर : महामार्गासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास मिळणारा मोबदला घटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शुक्रवारी राज्याच्या महसूल विभागाद्वारे जारी शासन निर्णयानुसार आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास २० टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास ६० टक्के कमी मोबदला मिळेल. या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरली आहे.
यापूर्वी अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक २ दिला जात होता. तो आता कमी करून १ करण्यात आला आहे. म्हणजेच मोबदला अर्धा होईल. इतकेच नव्हे, तर सर्व प्रकारच्या भूखंडांचा मोबदला निश्चित करताना रेडीरेकनरचे दरसुद्धा २० टक्के कमी करण्यात आले आहेत.
आमच्या सरकारने समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना भरपूर मोबदला दिला आहे. ज्यांना मोबदला मिळाला ते सर्व शेतकरी समृद्ध झाले. परंतु, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना धुळीस मिळविण्याची तयारी करताना दिसते. आमचा पक्ष हा मुद्दा योग्य व्यासपीठावर उचलेल.
- समीर मेघे, आमदार, भाजप.