वाहतूक करताना २० जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 06:03 PM2017-07-18T18:03:57+5:302017-07-18T18:03:57+5:30
ट्रकमधून ४२ गाई-बैल कोंबून वाहतूक करीत असताना त्यातील २० जनावरांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर (वर्धा) : ट्रकमधून ४२ गाई-बैल कोंबून वाहतूक करीत असताना त्यातील २० जनावरांचा मृत्यू झाला. यानंतर चालकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुटकी शिवारात ट्रक क्र. एमपी १७ एचएच १८०३ हा रस्त्याच्या बाजूला उभा करुन ठेवला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली असून पोलिसांंनी यातील २२ जनावरांची सुटका केली.
प्राप्त माहितीनुसार कुटकी शिवारात एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ट्रकची तपासणी केली. ट्रकच्या केबिनमध्ये कोणीच नव्हते तर मागील डाल्यात ४२ गाई-बैल यांना दोरीने बांधून ठेवले होते. चारापाणी न मिळाल्याने तसेच कोंबून नेण्यात आल्याने काही जनावरांचा यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नागपूर येथून सदर ट्रक हैद्राबाद येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मृत जनावरांना जमिनीत पुरले. तसेच जिवंत गुरांची सुटका करण्यात आली. वडनेर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत बागडी, अजय रिठे, दाते, देवेंद्र उडाण यांनी सदर कार्यवाही केली. जनावरांची तस्करी सुरू असताना गुदमरुन जनावरांचा मृत्यू झाल्याने चालक वाहन सोडून पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वडनेर पोलिसात पशुसंवर्धन कायदा १९९५ कलम ११ (१) सहकलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला.