‘समृद्धी’ वर महिनाभरात २० कोटी टोल; वाहनचालकांची पसंती, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 06:56 AM2023-01-15T06:56:12+5:302023-01-15T06:57:04+5:30
१ जानेवारी २०२३ रोजी समृद्धीच्या टोल वसुलीने नवा उच्चांक गाठला.
नागपूर: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गावर लावण्यात आलेल्या टोलच्या दरांवर मोठा गाजावाजा झाला होता. टोल जास्त असल्यामुळे वाहनचालक या मार्गावरून जाणे टाळतील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावर ११ डिसेंबर ते १० जानेवारी या महिनाभरात तब्बल २० कोटी ६६ लाख ३३ हजार ४८३ रुपयांची टोल वसुली झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी या मार्गावरून १० हजार २१० वाहने धावली व ६ लाख ७० हजार ९०२ रुपयांची टोल वसुली झाली. ख्रिसमस व थर्टी फर्स्टच्या दिवशी तर वाहनांची संख्या व टोल वसुनीचे उच्चांक गाठला. २५ डिसेंबर रोजी ३४ हजार १०२ वाहने धावली व ८६ लाख ५ हजार ९७ रुपयांची टोल वसुली झाली.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उच्चांक
१ जानेवारी २०२३ रोजी समृद्धीच्या टोल वसुलीने नवा उच्चांक गाठला. या दिवशी तब्बल ३३ हजार ४३७ वाहने धावली व ९४ लाख ३३ हजार ७८ रुपये टोल वसूल करण्यात आला.
अशी झाली टोलवसुली
दिनांक वाहने टोलवसुली
११ डिसेंबर १०,२१० ६,७०,९०२
१२ डिसेंबर १२,८८४ १३,४५,१७५
२५ डिसेंबर ३४,१०२ ८६,०५,०९७
३१ डिसेंबर ३०,०४७ ९०,३२,९८७
१ जानेवारी ३३,४३७ ९४,३३,०७८