नागपुरात राख्यांचा होतो २० कोटींचा व्यवसाय!; इको फ्रेंडली राख्यांना सर्वाधिक मागणी
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 24, 2023 03:34 PM2023-08-24T15:34:17+5:302023-08-24T15:34:55+5:30
किंमत १ ते ५०० रुपयांपर्यंत
नागपूर : राख्यांसाठी नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असून यंदा २० कोटींहून अधिक व्यवसायाची शक्यता आहे. नागपुरातून संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे राख्या विक्रीसाठी जातात. इतवारीत ५० पेक्षा जास्त ठोक विक्रेत्यांच्या माध्यमातून व्यवसाय होतो.
राखी सणाला काहीच दिवस उरले असून बाजारात महिलांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्याने यंदा राख्यांच्या किमती १० ते १५ टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मुलांच्या फॅन्सी राख्यांकडे कल
नागपूर जनरल मर्चंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राख्यांचे ठोक व्यापारी पंकज पडिया म्हणाले, नागपूर राख्यांच्या व्यवसायाचे नेहमीच मुख्य केंद्र राहिले आहे. येथून सर्वत्र माल पाठविला जातो. यंदा अमेरिकन स्टोन, फॅन्सी, एव्हिल आय, लुंबा, मोती, युनिकॉर्न, डोरोमॅन, बॅडमॅन, पबजी, कार्टुन, छोटा भीम, लाईट, संगीत असणाऱ्या राख्यांना मागणी आहे. शिवाय देशी आणि इको फ्रेंडली राख्यांना सर्वाधिक विकल्या जात आहेत. नैसर्गिक साधनांनी तयार झालेल्या मेळघाटच्या बांबू राख्यांची मागणी देशासह विदेशातही वाढली आहे. या राख्या मेळघाट येथील आदिवासींतर्फे तयार केल्या जातात. या राख्या ६० देशांमध्ये पोहोचल्या आहेत.
हॅण्डमेड राख्यांना मागणी
नागपुरात हॅण्डमेड राख्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होते. या राख्यांना सर्व स्तरातून मागणी आहे. गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि बचत गटांतर्फे राख्या तयार करण्यात येतात. सहा महिन्यांपासून राख्या तयार करण्याला सुरुवात होते. हॅण्डमेड राख्यांच्या निर्मितीला वेळ जास्त लागत असल्यामुळे हव्या तेवढ्या राख्यांची निर्मिती होत नाहीत.
ऑनलाइन मागणी वाढली
विक्रेते सुंदर शाह म्हणाले, राख्यांची ऑफलाइनसह ऑनलाइनही मागणी वाढली आहे. या राखीची किंमत २५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहे. विविध डिझाईनचे बॉक्स आणि महिला आवडीनुसार ऑनलाइनने राख्यांची खरेदी करीत आहेत.
रक्षाबंधनात चॉकलेटची दुनिया
रक्षाबंधन सणात गोड पदार्थांची जागा आता चॉकलेटनी घेतली आहे. खास रक्षाबंधनासाठी बाजारात नामांकित कंपन्यांनी चॉकलेटच्या अनेक व्हेरायटीज दाखल केल्या आहेत. ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेटचे रक्षाबंधनासाठी तयार केलेले बॉक्सेस मिठाईच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. हे चॉकलेट लहानांबरोबर तरुणांमध्येही लोकप्रिय ठरले आहेत. पेढे, जिलेबी, रसमलाई, श्रीखंड या पदार्थांपेक्षा रक्षाबंधनासाठी चॉकलेटलाच अधिक पसंती दिली जात आहे. रक्षाबंधनापूर्वी दुकानांमध्ये चॉकलेटची विक्री वाढली आहे.