विदर्भातील सिट्रस इस्टेटला २० काेटी; तर मराठवाड्याला ४० काेटी रुपये

By सुनील चरपे | Published: May 19, 2023 08:00 AM2023-05-19T08:00:00+5:302023-05-19T08:00:07+5:30

Nagpur News मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात संत्रा व माेसंबी बागांचे क्षेत्र अधिक असताना राज्य सरकारने विदर्भातील तीन सिट्रस इस्टेटला प्रत्येकी २० काेटी; तर मराठवाड्यातील एकमेव सिट्रस इस्टेटला ४० काेटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

20 crores to citrus estates in Vidarbha; 40 crores to Marathwada | विदर्भातील सिट्रस इस्टेटला २० काेटी; तर मराठवाड्याला ४० काेटी रुपये

विदर्भातील सिट्रस इस्टेटला २० काेटी; तर मराठवाड्याला ४० काेटी रुपये

googlenewsNext

सुनील चरपे

नागपूर : राज्यातील चार सिट्रस इस्टेटपैकी तीन विदर्भात, तर एक मराठवाड्यात आहे. मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात संत्रा व माेसंबी बागांचे क्षेत्र अधिक असताना राज्य सरकारने विदर्भातील तीन सिट्रस इस्टेटला प्रत्येकी २० काेटी; तर मराठवाड्यातील एकमेव सिट्रस इस्टेटला ४० काेटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही अन्यायकारक बाब असल्याची प्रतिक्रिया वैदर्भीय संत्रा व माेसंबी उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

संत्रा व माेसंबीवर संशाेधन करून दर्जेदार फळ उत्पादनासाठी पंजाबच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात मार्च २०१९ मध्ये ढिवरवाडी (ता. काटाेल, जिल्हा नागपूर), उमरखेड (ता. माेर्शी, जिल्हा अमरावती), तळेगाव (ता. आष्टी, जिल्हा वर्धा) व पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) या चार सिस्ट्रस इस्टेटला मंजुरी दिली. मंजुरीवेळी विदर्भातील तिन्ही सिट्रस इस्टेटला प्रत्येकी १२ काेटी, तर पैठण सिट्रस इस्टेटला २५ काेटी रुपये देण्यात आले हाेते. राज्य सरकारने चालू अर्थसंकल्पात विदर्भातील तिन्ही सिट्रस इस्टेटला प्रत्येकी २० काेटी, तर पैठण सिट्रस इस्टेटला ४० काेटी रुपये मंजूर केले आहेत.

निधीअभावी कामे रखडली

या निधीतून साॅइल टेस्टिंग व लिफ अनॅलिसिस लॅब, हायटेक नर्सरीची निर्मिती आणि प्रुनिंग मशिन उपलब्ध करून देणे यांसह इतर महत्त्वाची कामे करावयाची आहे. विदर्भातील सिट्रस इस्टेटला प्रत्येकी केवळ दीड ते दाेन काेटी रुपये देण्यात आले. त्यामुळे निधीअभावी महत्त्वाची कामे रखडली आहे.

राज्यातील संत्रा व माेसंबी क्षेत्र

महाराष्ट्रात १ लाख १९ हजार ८८६ हेक्टरमध्ये संत्र्यांच्या बागा आहेत. यातील १ लाख ९ हजार ९५३ हेक्टरमधील संत्रा बागा एकट्या विदर्भात असून, मराठवाड्यात ३ हजार ०२० हेक्टर, तर उर्वरित महाराष्ट्रात ६ हजार ९१३ मध्ये संत्रा बागा आहेत. राज्यातील माेसंबी बागांचे एकूण क्षेत्र ६४ हजार ८१२ हेक्टर असून, विदर्भात १२ हजार ६८८ हेक्टर, मराठवाड्यात ४८ हजार ७९३ हेक्टर, तर उर्वरित राज्यात ३ हजार ३३२ हेक्टरमध्ये माेसंबीच्या बागा आहेत.

 

विदर्भातील सिट्रस इस्टेटला अजूनही पूर्णवेळ स्वतंत्र अधिकारी देण्यात आले नाहीत. वेळेवर निधी दिला जात नाही. महत्त्वाच्या कामांना गती देणे आवश्यक असताना प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी साेपविण्यात आल्याने त्या कामांना वेग येत नाही. यात सर्वाधिक नुकसान विदर्भातील संत्रा व माेसंबी उत्पादकांचेच हाेत आहे.

- श्रीधर ठाकरे,

कार्यकारी संचालक, महाऑरेंज.

 

सरकारी आकडेवाडीनुसार राज्यातील संत्रा बागांचे क्षेत्र १ लाख २० हजार हेक्टर आहे. या आकडेवारीवर आक्षेप नाही. मात्र, विदर्भात दरवर्षी चार ते पाच लाख संत्रा, माेसंबीच्या कलमांची विक्री केली जाते. यातील ४० टक्के कलमे बाहेर जात असून, ६० टक्के कलमांची लागवड विदर्भात केली जाते. हे आकडे फलाेद्यान याेजनेंतर्गत लावण्यात आलेल्या संत्रा माेसंबी बागांचे असून, बहुतांश शेतकरी याेजनेचा लाभ न घेता बागा लावत असल्याने विदर्भातील संत्रा लागवड क्षेत्र १ लाख ५५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.

- मनाेज जवंजाळ,

संचालक, महाऑरेंज.

...

Web Title: 20 crores to citrus estates in Vidarbha; 40 crores to Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती