पीएम-उषा अंतर्गत नागपूर विद्यापीठाला मिळाले २० कोटी
By जितेंद्र ढवळे | Published: February 20, 2024 04:38 PM2024-02-20T16:38:56+5:302024-02-20T16:39:35+5:30
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कुलगुरू चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे उपस्थित होते.
नागपूर : भारत सरकारच्या उच्चतर शिक्षा विभागाच्या वतीने देशभरातील सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालये यांचे सशक्तीकरण करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचा (पीएम- उषा) शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रुसा केंद्राला २० कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी या निधीतून विद्यार्थ्यांसाठी संशोधनात्मक तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कुलगुरू चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे उपस्थित होते.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत १२९०६.१ कोटी रुपये इतकी राशी देशभरातील सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालय यांच्या सशक्तीकरणाकरिता मंजूर करण्यात आली आहे.
पीएम उषा या अभियानाची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने या कार्यक्रमात केली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालय व विद्यापीठ दोन्हीचे स्वतंत्र संचलन होणार आहे. विद्यापीठ हे आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्र बनावे म्हणून ही वित्तीय तरतूद करण्यात आल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
नागपूर विद्यापीठ काय करणार?
पीएम उषा अंतर्गत २० कोटी रुपयांच्या निधीतून आदिवासी इतिहास संग्रहालय आणि रुसा मल्टी फॅसिलिटी सेंटरला अत्याधुनिक संशोधन साहित्यातून नावीन्यपूर्ण बनविले जाणार आहे. सर्व स्वायत्त विभाग तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी रुसा केंद्रात अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये ५.५० कोटी रुपयांचे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, काॅनफोकल मायक्रोस्कोप, अल्ट्रा सेंट्रीफ्युज, प्लांट ग्रोथचेंबर, पॉली हाऊस, ॲनाकोंडा प्रोफेशनल वर्जन सॉफ्टवेअर, एसपीएसएस फाॅर इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट, एनव्हीआयडीआयए डीएचएक्स सिस्टीम, इंडिपेंडन्स ॲनॅलायझर, इंडिपेंडेंस ट्यूब फाॅर साऊंड ॲबसार्पप्शन मेजरमेंट, डेन्सिटी अँड साऊंड वेलोसिटी मीटर, मायक्रो विस्को मिटर, व्हिडिओ कॅमेरा अँड नेसेसरी अटॅचमेंट, टेलीप्रॉम्प्टर अँड अटॅचमेंट, व्हिजन मिक्सर अँड स्टुडिओ पीसीआर, सुसज्ज संगणक लॅब, अत्याधुनिक खेळांच्या सुविधा साहित्य, विद्यार्थी व शिक्षकांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण आदी घेतले जाणार आहेत.